ठाकरेंच्या शिवसेनेची पुन्हा हिंदुत्वाची हाक, ‘बाबरी’वरुन महाविकास आघाडीत बिघाडी!
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महा विकास आघाडीचा दारुण पराभव झाला.
विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. त्या दृष्टीने सर्वच पक्षांमध्ये तयारी सुरू झाली आहे. राज्यात मुंबई महापालिकेची निवडणूक महत्वाची आहे, पराभवाची मरगळ झटकून महा विकास आघाडीही तयारीला लागली आहे.
मात्र या निवडणुकीपुर्वीच महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाटाला तोंड फुटल्याचं चित्र दिसत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा ‘हिंदुत्वा’ची हाक दिली आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना हिंदुत्वापासून शिवसेना दुरावल्याचा प्रचार खोडून काढण्याचे आदेश दिले आहेत. ठाकरेंच्या पक्षाने निवडणुकांच्या तयारीमध्येच शिवसेनेने हिंदुत्व कधीही सोडलेले नाही. हिंदुत्वासाठी लढत राहणार, असे स्पष्ट केलं आहे.
अशातच बाबरीचं पतन झालं त्या दिवशी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव असलेल्या मिलिंद नार्वेकरांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेला ६ डिसेंबरला ३२ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नार्वेकरांनी या घटनेचं समर्थन करणारी पोस्ट केली.
मात्र या पोस्टवर काँग्रेस नेते रईस शेख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या भूमिकेचा निषेध नोंदवला आहे. यावरुनच काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेत वादाची ठिणी पडल्याचं दिसत आहे.
रईस शेख यांनी नार्वेकरांची पोस्ट रिपोस्ट करत आक्षेप नोंदवलं आहे. “मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मागील दोन निवडणुकीत – लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतदारांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. भारताच्या इतिहासातील त्या काळ्या दिवसाचे अशा प्रकारे गौरवीकरण करणं अयोग्य आणि अनावश्यक आहे. अशा प्रकारच्या गौरवीकरणाचा मी तीव्र निषेध करतो,” असं शेख यांनी म्हटलं आहे. यावरुन दोन्ही पक्षांमधील मतभेद उघडपणे समोर आले आहेत.
हिंदुत्वाचा मुद्दा महाविकास आघाडीतील बिघाडीसाठी कारणीभूत ठरु शकतो.
हिंदुत्वाच्या मुद्द्याचा ठाकरेंना फटका बसल्याची चर्चा असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा मुद्दाच ठाकरेंनी आधी हाती घेतल्याची चर्चा आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा