कोरोना संकटात अडचणी वाढणार; परिचारिका राज्यस्तरीय आंदोलनाच्या पवित्र्यात !
मुंबई (वृत्तसंस्था)। मागील सहा महिन्यापासून जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे, या काळातही परिचारिका, आपल्या जिवाची पर्वा न करता, वैयक्तिक, कौटुंबिक काळजी बाजूला ठेवून कोरोनाशी लढत आहेत, या काळात परिचारिकांना फ्रंटलाईन योद्धे असे संबोधून जगभर त्यांचे कौतुक केले जात आहे, परंतु राज्यात त्यांच्या वाट्याला फक्त शाब्दिक कौतुक व अवहेलना येत असल्याचा आरोप करून आपल्या न्यायिक प्रलंबित मागण्यासाठी ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातील परिचारिका महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून 1 सप्टेंबरला निदर्शने करणार आहेत.
शासन परिचारिकांच्या सहनशीलतेचा गांभीर्याने विचार करत नसल्याचे आरोप करीत परिचारीकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना अतिसंवेदनशील व न्यायिक मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याचे या संघटनेच्या अध्यक्षा हेमलता गजबे यांनी लोकमतला सांगितले. रुग्णसेवा विस्कळीत न करता काळ्या फिती लावून परिचारिका निदर्शने करणार आहोत. याची दखल न घेतल्यास 8 सप्टेंबरला एक दिवस काम बंद आंदोलन छेडणार आहे. त्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास आम्हास बेमुदत संपावर जावे लागणार असल्याचे गजबे यांनी सांगितले.
परिचारीकांच्या या आंदोलना चा इशारा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आला आहे. विविध मागण्यांसाठी छेडण्यात येणाऱ्या या आंदोलनाद्वारे आर्थिक अपव्यय टाळण्यासाठी व चांगल्या दर्जाच्या रुग्णसेवा देण्यासाठी रिक्त पदी नियमित पदभरती करणे, कोव्हीड कक्षात रोटेशन करताना अत्यंत अपुरे मनुष्यबळ असल्याने व रुग्ण संख्या क्षमतेपेक्षा खूप जास्त असल्यामुळे परिचारिकावर प्रचंड मानसिक ताण येतो, तो टाळण्यासाठी सात दिवस रोटेशन व सात दिवस कोरोंटाईन हा क्रम कायम ठेवावा. त्यांना प्रोटीनयुक्त आहार व चांगल्या दर्जाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी.
राज्य शासनाने केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता नव्याने मंजूर करून देण्यात यावा. अधिकाराचा गैरवापर करून परिचारिकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर विनाविलंब कडक कार्यवाही करण्यात यावी. राज्यातील परिचारिकांना फक्त रुग्णसेवेचीच कामे द्यावी, ग्रामीण रुग्णालय स्तरावर मासिक अहवाल तयार करणे, डाटा एन्ट्री ईत्यादि कारकुनाची कामे त्यांच्याकडून काढून घेण्यात यावी आदी मागण्यांसाठी परिचारीकांच्या ऐन कोरोनाच्या या महामारीत आंदोलन छेडणार आहे.