नोकरीच्या नावाखाली महिलांना लोटले वेश्याव्यवसायात; ३ तरुणींची सुटका
मुंबई (वृत्तसंस्था)। नोकरीच्या नावाखाली तरुणींना बांगलादेशातून मुंबईत आणून बळजबरीने वेश्याव्यवसायत लोटणाऱ्या टोळीचे पितळ उघडे करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. एका खोलीत डांबून ठेवलेल्या ३ बांगलादेशी तरुणींची चितळसर पोलिसांनी सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एका तरुणीने फोन करून आम्हाला ठाण्यातील एका इमारतीत डांबून ठेवण्यात आले असल्याची माहिती दिली. दरम्यान मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाकडून ठाणे पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. ठाणे पोलिसांनी तरुणीने दिलेल्या इमारतीचा शोध घेतला असता ही इमारत चितळसर मानसरोवर येथील धर्मवीर नगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक रवाना करण्यात आले. पोलिसांनी धर्मवीर नगर येथील एका इमारतीत छापा टाकला असता तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत २० ते २५ वयोगटातील तीन तरुणी आणि एक इसम मिळून आला.
पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीकडून चौकशी केली असता ‘आम्हाला रकी नावाचा इसम नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेश येथून जंगल नद्या च्या वाटेने कोलकत्ता येथे घेऊन आला होता, त्या ठिकाणी आमचे बोगस आधारकार्ड बनवून विमानाने मुंबईत आणण्यात आले, मुंबईतून थेट ठाण्यातील एका इमारतीत आणून एका खोलीत डांबून आम्हाला बळजबरीने वेश्याव्यवसाय लोटले’ अशी माहिती या तरुणींनी पोलिसांना दिली. पोलिसांनी या तरुणीची येथून सुटका केली असून या तरुणीच्या देखरेखीवर ठेवण्यात आलेल्या ४२ वर्षीय समीर हाजारी घोश याला अटक करण्यात आली असून रकी आणि गुलाम नावाच्या इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.