दहावी – बारावी परीक्षे संदर्भातील “तो” निर्णय शिक्षण मंडळाकडून अखेर रद्द
पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दहावी आणि बारावी च्या सर्व परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालक तसेच परीक्षक यांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु शिक्षक संघटनांच्या विरोधामुळे अखेर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आदलाबदल करण्याचा निर्णय अखेर मागे घेतला आहे.
इयत्ता दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी, म्हणून पर्यवेक्षक व केंद्र संचालकांची आदलाबदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या १०० कलमी कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आला होता. पण, शिक्षक संघटनांसह शिक्षक आमदारांच्या विरोधामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तो निर्णय बदलला आहे.
आता कोरोना काळातील २०२१-२२ या दोन परीक्षा वगळून मागील ५ वर्षाच्या म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०१८, २०१९, २०२०, २०२३ व २०२४ या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत. अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशीसंबंधित व्यक्तींची नियुक्ती संबंधित केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्यात येणार असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे.
११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार आहे. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा सुरु आहे. दुसरीकडे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणार असून त्यांची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात पार पडणार आहे.