” त्या ” वृत्ताने ऍड.रोहिणी खडसे संतप्त, महिला बालकल्याण मंत्र्यासह सी. ई. ओ. ना दिले तात्काळ पत्र
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l ” जि प च्या महिला बालकल्याण डीबीटी योजना गुंडाळल्या ” या आशयाचे वृत्त वाचताच महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. रोहिणी खडसे या चांगल्या संतप्त झाल्या, जिल्हा परिषदेने हा निधी इतरत्र कोणत्याही योजनांसाठी न वापरता हा निधी फक्त आणि फक्त महिलांच्या हितासाठी आणि रोजगारासाठीच वापरावा असे विनंती वजा पत्र महिला व बालकल्याण मंत्री ना.आदिती तटकरे व मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांना दिले आहे.
आर्थिक वर्ष 2024/25 च्या शेषफंड निधीतून 2 कोटी 10 लाखाचा निधी महिला बालकल्याण विभागाला मंजूर करण्यात आला आहे,मात्र यापैकी 50 लाखाचा निधी अन्यत्र वळवण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित झाले. त्यानंतर ऍड. खडसे यांनी तात्काळ पत्रव्यवहार करून त्यांची नाराजी व्यक्त केली.
त्यांनी म्हटले आहे की,शासनाकडून सर्वत्र महिला सक्षमीकरणावर भर दिला जात असताना जि.प. महिला बालकल्याण विभागाकडून महिलांच्या वैयक्तिक लाभाच्या डीबीटी योजना गुंडाळण्यात येत असल्याचा प्रकार अत्यंत खेदजनक आणि निंदनीय आहे. महिलांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा हा निधी फक्त आणि फक्त महिलांच्या हितासाठी आणि उत्थानासाठीच वापरण्यात यावा. डीबीटी योजनेच्या माध्यमातून महिला सक्षम व्हाव्यात, त्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने शिलाई मशीन, पिठाची गिरणी आदी साहित्य खरेदीसाठी वितरित करणे आवश्यक आहे,मात्र तसे न करता हा निधी अन्यत्र वळवण्यात आल्याची बाब ही अतिशय दुर्दैवी असून ग्रामीण भागातील महिलांवर जि प प्रशासनाकडून अन्याय करणारी आहे. या प्रकरणी संबंधितांनी तातडीने कार्यवाही करून डीबीटी योजनांचा पैसा त्याच हेड खाली वापरून ग्रामीण भागातील महिलांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.