‘मयत’ सातबारा आता ‘जिवंत’ होणार! सर्व मयत खातेदारांच्या ऐवजी आता वारसांची नावे नोंदवणार
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. राज्यातील ‘मयत’ सातबारा आता ‘जिवंत’ होणार! आहे. खाते उताऱ्यावर मयत खातेदारांची नांवे कमी करून त्याच्या ऐवजी वारसांची नावे लावण्यात येणार आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातबारा उताऱ्या संदर्भात एक अनोखी मोहीम सुरू केली असून सातबारा वरील सर्व मयत खातेदारांच्या ऐवजी वारसांची नावे नोंदवणार आहेत. १० मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सर्व जिल्ह्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या साठी तहसिलदारांची समन्वय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कशी असेल ‘जिवंत सातबारा मोहीम’
- १ ते ५ एप्रिल दरम्यान तलाठी हे गावात चावडी वाचन करतील.
- न्यायप्रविष्ट प्रकरण सोडून गाव निहाय मयत खातेदारांची यादी तयार करतील.
- ६ ते २० एप्रिल दरम्यान वारसा संबंधित कागदपत्रे तलाठींकडे सादर करता येतील.
- स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी हे वारस ठराव ई फेरफार प्रणाली मध्ये मंजूर करतील.
- २१ एप्रिल ते १० मे दरम्यान तलाठी यांनी ई फेरफार प्रणाली मध्ये वारस फेरफार तयार करावा.
- त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी वारस फेरफार वर निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करावा.
- जेणेकरून मयत व्यक्तीच्या ऐवजी सातबारा वर जिवंत व्यक्तींची नावे येतील.
या प्रमाणे मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.