जिल्हा हादरला…! १३ वर्षीय मुलाची गळा चिरून निर्घुण हत्या
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय मुलाचा खर्ची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतात गळा चिरलेल्या अवस्थेत मंगळवार दि. १७ जून रोजी सकाळी ८ वाजता मृतदेह आढळून आला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील असून मुलगा रिंगणगाव येथून बेपत्ता झालेला होता. या घटनेने
एरंडोल तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून हा प्रकार जुन्या वैमनस्यातून घडला की आणखी काही कारण आहे, याची चर्चा सुरू आहे. या बाबत एरंडोल पोलीस स्टेशन तपास करीत आहे.
तेजस गजानन महाजन (वय १३, रा.रिंगणगाव ता. एरंडोल. जिल्हा जळगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. तो रिंगणगाव येथे आई,वडील, मोठी बहीण यांच्यासह राहत होता. तेजसचे वडील गजानन हे शेती काम करून हार्डवेअरचे दुकान चालवत उदरनिर्वाह करीत आहेत.
दरम्यान सोमवार दि. १६ जून रोजी गजानन महाजन यांनी त्यांचा १३ वर्षीय मुलगा तेजस महाजन याला दुकानावर बसवून जळगावला कामानिमित्त निघून गेले होते. तर तेजस हा दुकान बंद करून घरी जाणे कुटुंबीयांना अपेक्षित होते. मात्र तेजस घरी आला नाही. सोमवारी गावाच्या बाजाराचा दिवस देखील होता. म्हणून शोधाशोध सुरू झाली. एरंडोल पोलीस स्टेशनला कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली.
यानंतर तेजसचा शोध रात्रभर सुरू ठेवला होता. अखेर मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील खर्ची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतामध्ये १३ वर्षीय मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती एरंडोल पोलिसांना काही ग्रामस्थांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता मृतदेह तेजस महाजन याचाच असल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेमुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. घटनास्थळी मोबाईल फॉरेनसिक व्हॅन दाखल झाली असून तपास सुरू झाला आहे. दरम्यान बालकाची हत्या करण्यामागील कारण काय याबाबतचा तपास पोलीस करत असून काही इसमांची संशयित म्हणून धरपकड केली असल्याची माहिती मिळत आहे. खुनाच्या घटनेमुळे पुन्हा एकदा जिल्हा हादरला आहे.