संपूर्ण जळगाव जिल्हा भगवामय, जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ११ जागा महायुतीच्या ताब्यात
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महा विकास आघाडीने यश मिळवले असताना मात्र जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही जागा भाजपने अर्थात महायुतीने मोठ्या फरकाने जिंकल्या.
आता विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात महायुतीने लोकसभेला जे प्रदर्शन दाखविले तेच प्रदर्शन महायुतीने अपेक्षेप्रमाणे दाखवत सर्व च्या सर्व ११ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. महाविकास आघाडीला जिल्ह्यात खातेही उघडता आले नसल्याने काँग्रेसचा सफाया झाला आहे.
विशेष म्हणजे कॉंग्रेसकडे असलेली रावेर विधानसभेची जागाही काँग्रेसच्या हातून गेली. येथे भाजप महायुतीचे अमोल हरिभाऊ जावळे यांनी महा विकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांचा ४३,५६२ मतांनी पराभव केला. अमोल जावळे (भाजपा) ११३६७६ मते, धनंजय चौधरी (कॉग्रेस) ७०११४ मते, अनिल चौधरी (प्रहार) २५१७० मते, दारा मोहम्मद अपक्ष ९८१४ मते मिळाली.
मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) रोहिणी खडसे यांचा पराभव केला. चंद्रकांत पाटील यांना १,११,६०१ मते मिळाली तर रोहिणी खडसे यांना ८७,६५६ मते मिळाली.
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे मंगेश चव्हाण व शिवसेना (उबाठा) गटाचे उन्मेश पाटील यांच्यात लढत झाली. यात भाजपचे मंगेश चव्हाण यांनी मोठ्या मताधिक्याने विजय नोंदविला.मंगेश चव्हाण यांना १ लाख ५७ हजार १०१ तर महाविकास आघाडीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना ७१ हजार ४४८ मते मिळाली.मंगेश चव्हाण हे ८५ हजार ६५३ च्या फरकाने ते विजयी झाले आहेत.
जळगाव ग्रामीण मध्ये आजी- माजी पालकमंत्र्यांमध्ये मुख्य लढत झाली. यात शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांनी माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा पराभव केला.गुलाबराव पाटील यांना १ लाख ४२ हजार ५९१ तर महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर ८३ हजार ४६१ मते मिळाली.
जामनेर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांनी आपला बालेकिल्ला अबाधित ठेवत पूर्वाश्रमीचे भाजपचे व आतचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रा. दिलीप खोडपे यांचा पराभव केला.गिरीश महाजन यांना १,२८,६६७ मते तर दिलीप खोपडे याना १,१,७८२ मते मिळाली.
पाचोरा मतदार संघातील लढतीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर पाटील यांनी अपक्ष उमेदवार अमोल शिंदे व उबाठा वैशाली पाटील यांचा पराभव केला.
चोपड्यात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत सोनवणे व उबाठा गटाचे प्रभाकर सोनवणे यांच्यात सरळ लढत होऊन चंद्रकांत सोनवणे यांनी विजयश्री खेचून आणली.
अमळनेरला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल भाईदास पाटील यांनी अपक्ष व माजी आ. शिरीष चौधरी, काँग्रेसचे डॉ. अनिल शिंदे यांना पराभूत केले. मंत्री अनिल पाटील हे ३३ हजार ४३५ मतांच्या फरकाने विजयी झाले आहे. यात त्यांना १ लाख ९ हजार ४४५ मते मिळवून ते विजयी झाले आहे. तर माजी आमदार शिरीष चौधरी यांना ७६ हजार १० मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. अनिल नाटू शिंदे यांना १३ हजार ७९८ मते मिळाली.
भुसावळमध्ये पुन्हा भाजपचे संजय सावकारे यांनी पुन्हा विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे डॉ. राजेश मानवतकर यांचा पराभव केला. संजय सावकारे यांना १ लाख ७ हजार २५९ तर डॉ. राजेश मानवतकर यांना ५९ हजार ७७१ मते मिळाली.डॉ. राजेश मानवतकर यांचा ४७ हजार ४८८ हजारानी पराभव केला.
जळगाव शहर मतदारसंघात भाजपाचे सुरेश भोळे यांनी पुन्हा विजय नोंदवित शिवसेना ठाकरे गटाचे जयश्री महाजन यांचा पराभव केला.आमदार राजूमामा भोळे यांना एकुण १ लाख ५१ हजार ५३६ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचे ठाकरे गटाच्या उमेदवार माजी महापौर जयश्री महाजन ६४ हजार ३३ मते मिळाली.तब्बल ८७ हजार ५०३ मतांच्या फरकाने भोळे यांचा विजय झाला.
एरंडोल मध्ये शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील यांनी माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. सतीश पाटील यांचा पराभव केला.अमोल पाटील यांना १ लाख १ हजार ८८ तर सतीश पाटील यांना ४४ हजार ७५६ मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष भगवान महाजन यांनी ४१ हजार ३९५ मिळाली.
संपूर्ण जळगाव जिल्हा भगवामय
जळगाव जिल्ह्यातील सर्व जागा महायुतीने जिंकल्याने संपूर्ण जळगाव जिल्हा भगवामय पाहायला मिळत आहे.