“त्या” मारहाण प्रकरणातील जखमी तरुणाचा अखेर मृत्यू
जळगाव, मंडे टु मंडे न्युज |जळगाव मधील १ फेब्रुवारी रोजी पिंप्राळा परिसरातील प्रशांत पाटील चौकात झालेल्या किरकोळ वादातून शुभम गजानन सपकाळे या २१ वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली. त्यात तो गंभीर जखमीं झाला. शुभमचा मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर पिंप्राळा परिसरात शोककळा पसरली असून संताप व्यक्त केला जात आहे.या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून दोन जण फरार आहेत.
शुभम सपकाळे हा रस्त्यावरून जात असताना, संशयित आरोपींनी त्याला अडवले. काहीही ठोस कारण नसताना विशाल भिका सोनवणे, चंद्रकांत उर्फ बाळा कोळी, यश प्रदीप पाटील (बाँड) आणि धीरज कोळी यांनी संगनमत करून शुभमला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शुभमच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती.
या संदर्भात या पूर्वीच रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता शुभमच्या मृत्यूनंतर या गुन्ह्यात खुनाचा गुन्हा वाढवण्याची प्रक्रिया पोलीस करत आहेत. शुभमचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच पिंप्राळा परिसरात तणाव निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिंप्राळा आणि शुभमच्या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

