राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार, “या” भागात मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l संपूर्ण जून महिन्यात लपंडाव खेळणाऱ्या पावसाने जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी राज्यात जोरदार पुनरागमन केले. मंगळवारी मुंबई उपनगरासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. पावसामुळे खरीप हंगामाला वेग आला असून शेतकरी सुखावला आहे. पुढील ४८ तासांतही राज्यात मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
आठवडाभरापूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाला होतं. मात्र, आता राज्याच्या किनारपट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव तसेच परभणी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन करण्यात आलंय.
मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसासोबतच आणखी एक संकट म्हणजेच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटाचाही अंदाज आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जुलै महिन्यात राज्यासह संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील एल-निनो तटस्थ अवस्थेत गेला आहे. त्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत ला-निनाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे.