राज्यात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ ठिकाणी अतिमुसळधार पाऊस
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात आजपासून पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती.नमात्र, शुक्रवार आणि शनिवार सलग दोन दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला. अशातच पुढील ४८ तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.
आज कुठे-कुठे कोसळणार पाऊस?
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज रविवारी कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर, नाशिक धुळे आणि नंदुबार जिल्ह्यांत आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उद्या म्हणजेच सोमवारी कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व मराठवाड्यात काही ठिकाणी दि. ७ रोजी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
विदर्भ-मराठवाड्याला पावसाचा इशारा
काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होणार असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर वाढणार
मुंबईसह उपनगरात शनिवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारी पहाटे पावसाने आणखीच जोर पकडला आहे. येत्या ३-४ तासांत मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण नवी मुंबईसह परिसरात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी काम असेल, तरच घराबाहेर पडावे, असं आवाहनही हवामान खात्याने केलं आहे.