सातपुड्यातील “त्या ” महिलेच्या मृतदेहाचे रहस्य अखेर उलगडले, भावांनीच फेकला जंगलात मृतदेह
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुका परिसरातील सातपुड्यातील गाडऱ्या या गावा जवळ वनक्षेत्रात १४ एप्रिल रोजी एका अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. तो मृतदेह कोणाचा? कोणी आणून टाकला,या बाबत पोलिस तपास करीत होते. मात्र तो मृतदेह, विधवा महिलेस कुष्ठरोग असल्याने ती भावांकडे रहात असताना तिला नातेवाइकांनी तिला वाळीत टाकले होते. याच दरम्यान तिचा मृत्यू झाल्याने अंत्यसंस्कार न करताच तिचा मृतदेह भावांनीच जंगलात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला.
सातपुड्याच्या जंगलातील यावल तालुक्यातील गाडऱ्या वनक्षेत्रात १४ एप्रिल रोजी लतिराम रमेश बारेला याला अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह दिसला होता. त्याने ही माहिती यावल पोलिसांना दिली होती. यावल पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून यावल रुग्णालयात आणला होता. येथे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वेळेस ओळख पटली नसल्याने मृतदेहावर नगर पालिकेच्या मदतीने पोलिसांनी अंत्यसंस्कार केले.
पुढे, पोलिस तपासात मृतदेह सुंदरीबाई अनार जमरे-भिलाला (५७, रा.मालखेडा, ग्रामपंचायत कुंभारबरडी, शिरवेल, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश) हिचा असल्याचे उघड झाले. तिचा मृत्यू तिच्या गावाच्या हद्दीत झाला होता. पण, भाऊ व इतर नातेवाइकांनी अंत्यसंस्कार न करताच मृतदेह गाडऱ्या गावाच्या वनक्षेत्रात टाकून दिला असल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
सदर महिलेच्या पतीचे निधन झाल्याने महिला मालखेडा, या गावात भाऊ पातव्या दावर याच्याकडे राहत होती. पण, कुष्ठरोग झाल्याने गावापासून एक किमीवर तिला ठेवले होते. भाऊ तिला तेथे दररोज अन्नपाणी नेऊन देत होता.
आणि अशातच ती आजारी असल्याने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिचा मृत्यू झाला. तिला कुष्ठरोग असल्याने तिचा अंत्यविधी कसे करणार म्हणून पातव्या दावर, मुकेश दावर व बिलसिंग दावर या तिघां भावांनी गोधडीची झोळी बनवून मृतदेह जंगलात फेकला होता.
पातव्या दावर, मुकेश दावर व बिलसिंग दावर या तिघां सख्ख्या भावांनी कुष्ठरोगी झालेल्या बहिणीवर अंत्यसंस्कार न करता मृतदेह जंगलात टाकून दिला होता. हाच मृतदेह कुजलेल्या अवस्थेतील यावल पोलिसांना मिळाला होता. यावलचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर, उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, पोलिस नाईक वसीम तडवी. हवालदार वासुदेव मराठे, पोलिस नाईक वसीम तडवी, यावल पालिकेचे जितू घारू यांनी माणुसकीचे दर्शन घडवत मृत महिलेवर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी पातव्या दावर, मुकेश दावर व बिलसिंग दावर या तिघांना ताब्यात घेतले आहे.