ब्रेकिंग- सरकार लॉकडाउन पूर्णपणे हटवण्याची शक्यता !
मुंबई (वृत्तसंस्था): राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून गेल्या 5 महिन्यांपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. परंतु, जनजीवन सुरळीत व्हावे या हेतूने अनलॉकची घोषणा करत काही अटी शिथिल करण्यात आल्या होत्या. आता पुढील काही दिवसांत लॉकडाउनमधून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी सरकार आणखी अटी शिथिल करणार आहे.
येत्या बुधवारी मुंबईत महाविकास आघाडी सरकारची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये लॉकडाउनमधून लोकांची सुटका करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. बुधवारी होणाऱ्या या बैठकीमध्ये खासगी वाहनांना ई-पास कायम ठेवायचा की, नाही याबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील लोकल सेवा ही सर्वसामान्यांसाठी अजूनही बंदच आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून लोकल वाहतूक सुरू आहे. लोकल सेवा सुरू झाली तर मुंबई पूर्वपदावर येईल, असा सूर आहे. त्यामुळे लोकल सेवा सुरू करायची तर नेमके काय करावे लागले, याचीही चर्चा केली जाणार आहे. लोकल सेवा सुरू झाली तर कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती सरकारला आहे. त्यामुळे अद्याप लोकल सेवा ही अत्यावश्यक म्हणून चालवली जात आहे. म्हणून, बुधवारी होणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या बैठकीत लॉकडाउन संपुष्टात आणण्यावर चर्चा होईल. पण, याची अंमलबजावणी ही गणेश विसर्जनानंतर होण्याची शक्यता आहे.
लॉकडाउनच्या काळात विवाह सोहळ्यांना बंदी घालण्यात आली होती. परंतु, अनलॉकमध्ये विवाह सोहळ्याला परवानगी देत 50 लोकांना हजर राहण्यास अट घातली होती. पण आता ही अट मागे घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लग्न सोहळ्याला आता 50 हुन अधिक लोकांना बोलवता येणार आहे. परंतु, यासाठी जितके लोकं लग्नाला बोलावयचे आहे, त्यासाठी मंगल कार्यालय किंवा हॉल मोठा शोधावा लागणार आहे. त्यामुळे, हा निर्णय झाल्यावर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमही सुरू होऊ शकतील. परंतु, ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घ्यायचा आहे, तो भाग हा कंटेनमेंट झोनमध्ये असता कामा नये. सप्टेंबर महिन्यात केंद्राकडून याबद्दल नवीन आदेश काढण्यात येण्याची शक्यता आहे, याबद्दल तसा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यटनमंत्री प्रल्हाद पटेल यांनी दिली.