केळी बागांमध्ये बिबट्याचे वास्तव्य ; शेतकरी, मजुरांमध्ये दहशत, सुकळी शिवारात काळवीटाची शिकार
सुकळी, ता. मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज, ज्ञानेश्वर सावळे |मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनक्षेत्रांतर्गत डोलारखेडा वनपरिमंडळातील सुकळी ता. मुक्ताईनगर. शिवारात केळी बागांमध्ये बिबट्याने काळवीटाची शिकार केल्याची घटना उघडकीस आल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर वनविभागाने तातडीने पंचनामा करून परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले असून, शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.
म्मुताईनगर तालुक्यातील ‘मुक्ताई-भवानी’ अभयारण्यालगत असलेल्या सुकळी शिवारातील केळी बागांचा थंडावा आणि गारवा वन्यप्राण्यांना आकर्षित करत आहे. वाढत्या उष्णतेमुळे वाघ, बिबटे आणि इतर हिंस्र प्राणी उन्हाळ्यात केळी बागांमध्ये आश्रय घेत असल्याचे दिसून येते. शेतात बिबट्यांचे पाऊलखुणा आणि तृणभक्षी प्राण्यांचा वावर यामुळे शेतकऱ्यांमध्ये सावधगिरी वाढली आहे. अलीकडेच यावल तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा बळी गेल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी शिवारातील शेतकरी ज्ञानेश्वर पुंडलिक बावस्कर यांच्या केळी बागेत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या पाऊलखुणा आढळत होत्या. सांबर, नीलगाय, काळवीट आणि रानडुक्कर यांसारखे तृणभक्षी प्राणी अन्नाच्या शोधात येथे येत होते. याचदरम्यान बिबट्याने काळवीटाची शिकार केल्याने परिसरात खळबळ उडाली. वनपरिक्षेत्र अधिकारी परिमल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गणेश गवळी आणि वनरक्षक रणजित चव्हाण यांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले.
वनविभागाचे सतर्कतेचे आवाहन
वनविभागाने शेतकऱ्यांना भीती न बाळगता सावधगिरीने शेतीकाम करण्याचा सल्ला दिला आहे. शेतात एकट्याने किंवा बेसावध जाऊ नये, हातात काठी, लांब प्रकाशझोताची बॅटरी ठेवावी, संगीत वाजवावे, गुरे-ढोरे उघड्यावर बांधू नयेत, गावातील कुत्र्यांपासून बिबट्यांना दूर ठेवावे आणि रात्री उघड्यावर झोपणे टाळावे, अशा सूचना वनविभागाने दिल्या आहेत. तसेच, बिबट्या-मानव संघर्ष टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न वनविभागाकडून शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मार्गदर्शन सुरू आहे. ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे परिसरावर लक्ष ठेवले जात असून, वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांनी सतर्क राहून वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
बिबटे आहेत तरी किती?
आठवडाभरापूर्वी तालुक्यात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. यासोबतच अंतुर्ली व शेमळदे परिसरात नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी, या भागात प्रत्यक्षात किती बिबटे आहेत? हा प्रश्न अधिक गंभीर होत असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण गडद होत आहे. वनविभागाने यावर स्पष्टता देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.