राज्यावर वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचं मोठं संकट, उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा अंदाज
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात जोरदार पावसाचा धोका निर्माण झाला आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानहून खालच्या बाजूने सायक्लोनिक सर्क्युलेशनचा धोका आहे. तसेच पश्चिम बंगालच्या उपसागरातही सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. तर पाकिस्तानजवळही कमी दबाचा पट्टा तयार झाला आहे. त्या मुळे वादळी वारे, विजा आणि गारांसह पाऊस पुढील सात दिवसांत शक्य असल्याचा व याची तीव्रता थोडी कमी होईल असा अंदाज वर्तविण्यात आला असून ६-७ मे रोजी २३ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एकीकडे उकाड्याने नागरिक त्रस्त असताना मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा या विभागांमध्ये आज आणि उद्या पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.
उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा अंदाज
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्येही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता आहे.
आज ६ मे रोजी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहणार आहे. राज्याची राजधानी मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.