नीट पेपरफुटी प्रकरणाचं भीषण वास्तव! कशी होती पैसे कसे उकळण्याची योजना,कसा चालायचा गोरखधंदा
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नीट पेपरफुटीचं (NEET जाळं थेट महाराष्ट्रापर्यंत पसरल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आणि सर्वांना धक्का बसला. नीट (NEET Exams) गैरव्यवहार प्रकरणातला लातूर पॅटर्न उघड झाला. लातूर पोलिसांनी याप्रकरणी आता तपासाची चक्र वेगानं फिरवण्यास सुरुवात केली आहे. संजय जाधव आणि जलील पठाण या दोन जिल्हा परिषद शिक्षकांना नांदेड एटीएसनं अटक केली आहे. पोलिसांनी जाधव, पठाण आणि उमरगा आयटीआयमध्ये नोकरीस असलेल्या इरान्ना कोनगलवार यांच्या घराची झडती घेतली. त्यात ‘नीट’च्या १२ विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट आणि सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही टोळी, ५ लाख रूपयांच्या मोबदल्यात आरोपी विद्यार्थ्यांचे गुण वाढवून द्यायचे, असा खळबळजनक खुलासा पोलिसांच्या तपासात समोर आला आहे.
लातूर घोटाळ्यात संशयित असलेल्या इतर तीन जणांच्या घरातून पोलिसांनी ६ मोबाईल आणि १२ विद्यार्थ्यांची हॉलतिकीटं जप्त केली आहेत. आर्थिक व्यवहाराचा मुख्य सूत्रधार गंगाधर मुंडेच्या शोधासाठी पोलीस दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्यानं मिळत आहे. तसेच, या घोटाळ्यात पोलिसांच्या संशयानुसार, नीट पेपरच्या गोरखधंद्यात कोण, कोणती भूमिका बजावत होतं? याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. त्यानुसार सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, नीट पेपरचा गोरखधंडा लातुरातून थेट दिल्लीपर्यंत सुरू होता.
आरोपींपैकी कोण, काय आणि कसं करत होतं नीट पेपरचा घोटाळा?
पोलिसांना आतापर्यंत हाती लागलेल्या पुरावे आणि माहितीवरुन त्यांनी याप्रकरणात काही अंदाज बांधले आहेत. ते या प्रमाणे… लातुरातील नीट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींची नावं समोर आली आहेत. आरोपींनी एक साखळी तयार केली होती आणि प्रत्येकानं आपापली कामं ठरवून घेतली होती. अटकेत असलेला पहिला आरोपी जलील पठाण हा विद्यार्थी हेरायचा, त्यानंतर त्यांना आमिष दाखवायचा आणि विद्यार्थ्यांनी तयारी दर्शवल्यानंतर त्यांना रेट द्यायचा. परीक्षेचे गुण वाढवण्यासाठी तब्बल ५ ते ७ लाख रुपये हे टोळकं विद्यार्थ्यांकडून उकळायचं. काही पैसे विद्यार्थ्यांकडून अॅडव्हान्स म्हणून घेतले जायचे आणि त्यानंतर विद्यार्थी त्यांचं हॉलतिकीट द्यायचे, ते हॉलतिकीट आरोपी संजय जाधवकडे पाठवलं जायचं.
अटकेत असलेला दुसरा आरोपी शिक्षक संजय जाधव त्याच्याकडे असलेल्या दोन मोबाईल्सवरुन इच्छुक विद्यार्थ्यांची हॉलतिकीटं आणि अॅडव्हान्स घेतलेले पैसे जमा करुन इसन्नाकडे पाठवून द्यायचा, असा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर पुढे इसन्ना त्याच्याकडे आलेला डेटा आणि पैसे दिल्लीत राहणाऱ्या मुख्य सूत्रधार गंगावर मुंडे याच्याकडे पाठवायचा. त्यानंतर त्या-त्या विद्यार्थ्यांचे गुण वाढून येईपर्यंत पाठपुरावा करायचा, असाही आतापर्यंतच्या तपासातून पोलिसांनी अंदाज बांधला आहे.
दिल्लीत राहणारा गंगाधर मुंडे हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे. ज्या मुलांचे पैसे मिळालेत त्यांचे नीट परीक्षेत गुण वाढवणं, त्यांना आधी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणं ही सर्व कामं गंगाधर मुंडे पाठपुरावा करायचा करायचा, असं गेल्या अनेक दिवसांपासून हे रॅकेट काम करत होतं, असा संशय पोलिसांना आहे.
पोलिसांनी आरोपी शिक्षक संजय जाधवकडून २, पठाणकडून ३ तर इसन्नाकडून एक मोबाईल जप्त केला आहे. आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी तिघांचे बँक पासबुक जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मोबाईलमध्ये काही सांकेतिक भाषेत मेसेज आहेत, ते तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.
पेपरफुटी प्रकरणातील चार आरोपी नेमके कोण?
नीट पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. लातूर येथील संजय जाधव, जरील खान, उमरखान पठाण यांचा अजून एक साथीदार याच भागातील आहे. इरणणा कोनगलवार, असं या प्रकरणातील चौथ्या आरोपीचं नाव असून धाराशिवमधील उमरगा जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या चारही आरोपींचा संपर्क दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीसोबत असल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच, नीट परीक्षेच्या पेपर्सच्या व्यवहारात दिल्लीतील व्यक्तीचा मोठा हात असल्याची माहिती समोर आली आहे.