सुकळी शिवारातील विद्युत पोल वरील वीजतारांची चोरी ; शेतकरी वर्ग धास्तावला
सुकळी, ता. मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज, प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी शेती-शिवारातील विद्युत खांबावरील वीजतारा चोरी झाल्याची घटना आज पहाटे उघडकिस आली. दरम्यान या घटनेने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून शेतकरी वर्ग पुरता धास्तावलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, २ मे च्या मध्यरात्री अज्ञाताकडुन सुकळी येथील शेतकरी माजी पंचायत समिती सभापती विकास समाधान पाटील,दादाराव नामदेव पाटील,किशोर भागवत पाटील यांच्यासह आजुबाजूच्या शेतातील उभ्या विद्युत पोलवरील अल्युमिनियम च्या वीज तारा चोरट्यांनी लांबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याबाबत पोलीसात तक्रार देण्यात आली असुन पो निरी नागेश मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली साहा फौजदार विजय पठार,पो काॅ पवन सपकाळ व सुकळी पो.पाटील संदिप इंगळे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
सहा ते सात पोलवरील अंदाजे ४० हजार रुपये किमतीच्या वीजतारा चोरी झाल्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.काही तारा घटनास्थळावर पडुन होत्या.
दरम्यान ऐन उन्हाळ्यात घडलेल्या या घटनेमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. केळी पिकाला दररोज नियमितपणे पाणी द्यावं लागत असल्याने नवीन तारा जोडणी होईपर्यत पाणी देण्याची पंचाईत होणार आहे. याशिवाय पीकांना फटका बसेल. तसेच या घटनेमुळे शेतकरी वर्ग धास्तावला असुन शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. या चोरांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे