…मग मेव्हण्यांसाठी पण अशीच योजना सुरु करा ना… मुख्यमंत्री साहेब त्यांनाही हजार पाचशे रुपये द्या…जळगावच्या शेतकऱ्याची मागणी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला सुरुवात झाली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. सोमवारी १ जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली आहे. आता या योजनेवरुन जळगाव च्या एका शेतकऱ्याने सरकारला टोला लगावला आहे. मुख्यमंत्री साहेब, लाडका मेव्हणा योजना सुरू करा, त्यांनाही हजार पाचशे रुपये द्या,..अशी मागणी या जळगावच्या शेतकऱ्याने केली आहे.
जळगाव मधील एका शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक शेतकरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेबद्दल भाष्य करताना दिसत आहे. त्याने एका व्हिडीओद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साद घातली आहे.
मेव्हण्यांसाठी पण अशीच योजना सुरु करा, त्यांनाही हजार पाचशे द्या..शेतकऱ्याची मागणी
मुख्यमंत्री साहेब बहिणींसाठी तुम्ही खूप चांगली योजना सुरु केली. मग मेव्हण्यांसाठी पण अशीच योजना सुरु करा ना… मेव्हन्यानी तुमचं काय घोडं मारलं आहे. मुख्यमंत्री साहेब त्यांनाही हजार पाचशे रुपये द्या, अशी मागणी एका शेतकऱ्यांना दिले आहे.
हा व्हिडीओ जळगावातील एका खानदेशी शेतकऱ्याचा आहे. यात हा शेतकरी खानदेशी या बोली भाषेतून मुख्यमंत्र्यांपुढे आपलं मागणं मांडत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खानदेशी बोली भाषेतल्या शेतकऱ्याच्या व्हिडीओची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेवरुन या खानदेशी शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साद घातली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना नेमकी काय?
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. १ जुलै २०२४ पासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. कमीतकमी ३.५० कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे.
या महिलांनाच मिळणार योजनेचा लाभ?
लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं आवश्यक आहे.
राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
किमान वयाची २१ वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत.
सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणं आवश्यक आहे.
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम २.५० लाखांपेक्षा जास्त नसावं.