मालकाचेच गोडाऊन फोडून चोराला साडेआठ लाखांचा पापड मसाला, चौघांना पोलिस कोठडी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बंद असलेल्या गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून ८ लाख ३५ हजार १०२ रुपये किमतीचा पापड मसाला चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि. २४ ते २६ मार्च दरम्यान जळगाव एमआयडीसी परिसरातील एम सेक्टरमध्ये घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांच्या तपासात चोरटा हा फिर्यादी मालकाचा चालक निघाला. त्या सोबत आणखी त्याचे तीन साथीदार अशा चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जळगाव एमआयडीसी येथे एम सेक्टर २११/२ येथे श्री प्रभु डिस्ट्रीब्युटर्स नावाची अतुल विश्वनाथ मुळे यांच्या मालकीची कंपनी आहे. ही कंपनी जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांमध्ये रामबंधु मसाले कंपनीची अधिकृत डीलरशीप सांभाळते. दि. २५ मार्च २०२५ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या गोडाऊनचे शटर तोडून सुमारे ०८ लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या ७१ गोण्या चोरून नेल्या.
दि. २७ मार्च २०२५ रोजी अतुल मुळे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्या नुसार त्वरीत तपास पथक नेमण्यात आले.
तपासादरम्यान घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. चोरट्यांनी तोंडावर रुमाल बांधून इको कारचा वापर करत गोडाऊन फोडल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने वापरलेले वाहन आणि त्यातील व्यक्तींची ओळख पटवण्यात आली. तपासादरम्यान, फिर्यादी अतुल मुळे यांचे मागील १५ वर्षांपासून चालक असलेले अनिल रमेश पाटील (रा. मिल कॉलनी, खडका, भुसावळ) यांनीच त्यांच्या साथीदारांसोबत हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. अनिल पाटीलला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यावर त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली.
त्यानुसार संशयित बाबुराव त्र्यंबक सुरवाडे (रा. पळासखेडा, ता. जामनेर), शिवा सुरेश पाटील (रा. भवानी नगर, खडका, भुसावळ), राहुल बाविस्कर (रा. खडका, ता. भुसावळ) यांना पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली. त्यांना ०२ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. चोरीस गेलेल्या सर्व ७१ गोण्या ०८ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या आणि चोरीसाठी वापरलेली दोन इको वाहने जप्त करण्यात आली आहेत.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, तसेच पोलीस कर्मचारी राहुल रगडे, गणेश ठाकरे, विशाल कोळी, सिद्धेश्वर डापकर, रतन गीते यांनी तपासात भाग घेतला.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि पोलीस कर्मचारी योगेश घुगे करीत आहेत.