सावधान : जळगाव जिल्ह्यात जीबीएस आजाराचा तिसरा रूग्ण, तीन वर्षाच्या बालकाला GBS चा आजार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत जीबीएस आजाराचे दोन आढळले होते. त्यात भर म्हणून आता तिसरा रूग्ण आढळला आहे. हा तिसरा रूग्ण तीन वर्षाचा बालक आहे.
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील एका तीन वर्षीय बालकाला ग्युलन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) बालरोग विभाग अतिदक्षता वॉर्डात उपचार सुरू आहे.
या आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्ण आढळून आले असून, जळगाव तालुक्यातील ४५ वर्षीय महिला रुग्णाला डिस्चार्ज दिला, तर रावेरच्या २२ वर्षीय तरुणावर उपचार सुरू असून त्याची तब्येत सुधारत असल्याचे डॉ. पाराजी बाचेवर यांनी सांगितले. रावेर तालुक्यातील हा २२ वर्षीय तरुण महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराज येथे गेला होता. तेथून परत आल्यावर प्रकृती ठीक नसल्याने त्याने बऱ्हाणपूरला खासगी रुग्णालयात उपचार घेतले. तेथे जीबीएससदृश लक्षणे जाणवल्याने डॉक्टरांनी त्यास न्यूरोलॉजिस्ट किंवा मुंबई येथे उपचार घेण्याचा सल्ला दिला. याची माहिती प्रशासनाला समजल्यानंतर रुग्णाला मंगळवारी जीएमसीत दाखल करण्यात आले होते.
जळगाव शहरातील या बालकाला गेल्या काही दिवसांपासून पायदुखीचा त्रास जाणवत असल्याने रक्त तपासणी केली असता जीबीएस आजार झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर तत्काळ जीएमसीचे अधिष्ठाता गिरीश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ज्ञ डॉ. बाळासाहेब सुरोसे, डॉ. गिरीश राणे यांनी उपचार सुरू केले आहेत.
