“त्या ” दोघा पोलीस कर्मचाऱ्यांची एलसीबीतून उचलबांगडी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | हप्ता वसूल करणाऱ्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांची एलसीबीतून उचलबांगडी करण्यात आली असून ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपींच्या संपर्कात असणाऱ्या उपनिरिक्षकाला पोलीस नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पाचोरा तालुक्यात वाहनधारकांकडून पैसे स्वीकारणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. यानंतर जळगाव शहर पोलीस स्थानकातील दोन कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या पाठोपाठ आता हप्तेखोरी व आरोपींशी संबंधावरून उपनिरिक्षकासह तिघांवर कारवाई करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा म्हणजेच एलसीबीतील तिघांवर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मोठी कारवाई केली आहे. यात गजानन देशमुख आणि संघपाल तायडे या दोन कर्मचाऱ्यांनी गुटखा व पेट्रोल विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून हप्ता घेतांनाचा व्हिडीओ चित्रीत करण्यात आला असून तो एसपींना पाठविण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अजून एक गंभीर बाब म्हणजे एलसीबीचे पोलीस उपनिरिक्षक दत्ता पोटे यांनी ड्रग्ज प्रकरणात फरार असलेल्या अरबाज या आरोपीशी आपल्या मोबाईल फोनवरून तब्बल 352 वेळेस संपर्क साधल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी चौकशी करून पोटे यांना पोलीस नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे. तर गजानन देशमुख आणि संघपाल तायडे यांना पाचोरा आणि फत्तेपूर येथे बदली करून पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांना दिली आहे.