भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिक

१२ वर्षांच्या मुलासह दोन जणांचा नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : नाशिकमधल्या गोदावरी नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेत असतांना इतर दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यात एका अवघ्या बारा वर्षांच्या मुलासह १८ वर्षाच्या तरुणांचा समावेश आहे.

याबाबत सविस्तर असे, पहिली घटना रामकुंडाजवळच्या गांधी तलावात घडली. यात उत्तम नगरमधल्या गणेश कॉलनीतले महाजन कुटुंब देवदर्शनासाठी आले होते. या कुटुंबातील रावसाहेब महाजन (वय 36) यांचा पाय घसरला आणि ते गोदापात्रात कोसळले. त्यांना शोधण्यासाठी जीवरक्षक जवानांनी खूप प्रयत्न केले. मात्र, पाण्याची पातळी जास्त असल्याने त्यांना अपयश आले. खूप उशिराने त्यांचा मृतदेह हाती लागला. रावसाहेब यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. दुसऱ्या घटनेत पाण्यात पडलेले रावसाहेब महाजन यांचा शोध घेताना जीवरक्षक जवानांना एक मृतदेह आढळला. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता, तो ओवेस नदीम खान या अवघ्या अठरा वर्षांच्या तरुणाचा असल्याचे समजले. तिसऱ्या घटनेत साहील सलीम अन्सारी या अवघ्या बारा वर्षांच्या मुलाचा गोदापात्रात बुडून मृत्यू झाला. तो नाशिकमधल्या बुधवार पेठेत रहायचा. साहील हा घरात कोणालाही न सांगता गोदापात्रावर अंघोळीला गेल्या असल्याचे समजते. त्यात पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये महिनाभरापासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे ओसंडून भरली आहेत. गंगापूर धरणातून गोदापात्रात पाणी सोडणे सुरू होते. त्यामुळे गोदावरी नदीही ओसंडून वाहत आहे. हे ध्यानात घेता गोदापात्राकडे फिरकू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक धरणांवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. धरण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!