उद्या दि. २४ रोजी जमा होणार पी एम किसान सन्मान निधीचा १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात
नवी दिल्ली, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता उद्या सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून एकूण २२ हजार कोटी रुपयांचा निधी थेट ९.८ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवला जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील भागलपूर येथून या हप्त्याचे वितरण करणार आहेत. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१९ मध्ये ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये, प्रत्येकी २ हजार रुपये, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेच्या १८ हप्त्यांद्वारे ३६ हजार रुपये मिळाले आहेत. आता १९ वा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल.