जळगाव महापालिकेत सत्तांतरासाठी एकनाथ खडसेंचा पुढाकार असणार– प्रविण दरेकर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (निशाद साळवे): जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाच्या सर्व विरोधक व राज्यातील सत्तेच्या माध्यमातून शिवसेनेने महापालिकेत महापौर निवडून आला आहे. हा तात्कालीक विजय आहे. दोन दिवसांनी पुन्हा सर्व विस्कळीत झालेले दिसेल. आमिषामुळे फुटलेले नगरेसवक जनतेला सामोरे जातांना काय उत्तर देतील, असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
ते म्हणाले, या सर्वांत एकनाथ खडसे यांनीच पुढाकार घेतला असणार. त्यात काहीच दुमत नाही. त्याच्या जोडीला असलेली सत्ता. नगरविकास खाते. राज्याचे मुख्यमंत्री, सरकार या सत्तेचा वापर करीत वेगवेगळी प्रलोभने व आमिषे दाखवून मिळवलेला हा विजय आहे. भाजपला एकट्याने धक्का देऊ शकत नाही. म्हणून मग सर्व विरोधक त्यासाठी एकत्र आलेले दिसतात. जेव्हढे एकत्रीत येऊन धक्का देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यात काहीच मुलभूत नसल्याने दोन दिवसांनी हे सर्व पुन्हा विस्कळीत झालेले दिसेल व भाजप अधिक ताकदीने मतदारांपुढे गेल्याचे दिसेल. या निर्णयाने आम्ही विचलीत झालेलो नाही.
भाजप नेते श्री. दरेकर यांनी जळगाव महापालिकेतील सत्तांतराविषयी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, भाजपच्या प्रतिस्पर्ध्यांनी बांधलेली ही तात्कालीक मोट आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांचे जळगाव जिल्ह्यातील वर्चस्व आणि संपुर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष विरुद्ध अन्य सर्व राजकीय पक्ष हे चित्र आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांना कोंडीत पकडण्याच्या दृष्टीने येथे एकनाथ खडसे भाजप सोडून गेल्यानंतर सर्व पक्षांनी एकत्रीत येऊन झालेला हा महापौर आहे. त्यामुळेच हा तात्कालीक विजय आहे. त्याचे दिर्घकालीन काही राजकीय फायदे होतील असे मला अजिबात वाटत नाही. दोन दिवसांसाठी गिरीश महाजनांना धक्का दिला, अशा प्रकारे बातम्यांपलिकडे त्यातून काहीच साध्य होणार नाही, असे श्री. दरेकर म्हणाले. जळगाव महापालिकेतील नगरसेवक भाजपच्या विचारधारेवर निवडून आले आहेत. त्यांना जेव्हा पुन्हा मतदारांना सामोरे जावे लागेल, तेव्हा त्यांना या चुकीची जाणीव होईल. तेव्हा त्यांना जनतेला उत्तर द्यावे लागेल. मतदारांना ते उत्तर अपेक्षीत असेल. जेव्हा त्यांना मतदार, कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागेल तेव्हा त्यांना यावर भूमिका मांडावी लागेल. त्या सर्व गोष्टींचा भविष्यात विचार होईल. त्यामुळे हा तात्कालीक निर्णयच आहे. दिर्घकालीन त्याचा काहीच उपयोग होणार नाही.