मद्यधुंद तीन पोलिसांची आपापसात बाचाबाची, कुठे घडला हा प्रकार?
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l मद्यधुंद असलेत्या तीन पोलिसांची काल भरदुपारी बियरबार मध्ये जोरदार बाचाबाची झाली, ते तिघे मद्य पिऊन तर्रर्र झालेले असताना पोलिसांमध्ये जोरदार वाद होऊन आपसात हाणामारी ही झाली. ही घटना रविवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली. आपसात बाचाबाची होऊन वाद झालेले हे पोलिस जिल्ह्यातच असून जळगाव मध्ये बंदोबस्तासाठी आलेले असल्याची माहिती मिळत आहे.
रविवार दिनांक २५ रोजी दुपारी भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये चार ते पाच पोलिस कर्मचारी आले. ते गणवेशातच होते व वर जॅकेट घातले होते. आधी मद्यपान केल्यानंतर ते निघून गेले. मात्र काही वेळाने परत तेथे आले व पुन्हा मद्यपान केले. बारमध्ये बसलेले असतानाच तेथे दोन ग्लास त्यांनी फोडले. त्यानंतर संध्याकाळी साडेपाच ते पावणे सहा वाजे दरम्यान बाहेर आल्यानंतर त्यांच्यात आपसात वाद झाले. बराच वेळ त्यांच्यात बाचाबाची सुरू होती.
शेवटी हा वाद इतका वाढत गेला की तिघे पोलिस एकमेकांना भिडले त्यात त्यांची एकमेकांना चांगलीच धरपकड झाली. त्यात एक जण तर चिखलातही पडला. त्या नंतर तर्रर्र झालेले हे पोलिस कर्मचारी पोलिसांचा लोगो असलेल्या कारमध्ये क्र. एमएच ०२, ईएच १०४८ बसले व ती कार काढत असताना दोन दुचाकींना त्यांनी धक्का दिल्याने त्या खाली पडल्या. त्यानंतर कशीबशी कार काढली व रस्त्याला लागल्यानंतर समोर एका सायकल स्वार मुलाला धडक दिली. त्यात तो मुलगा खाली पडला तरी देखील न थांबता कारचालक भरधाव वेगाने पसार झाला. यात सुदैवाने मुलाला काही दुखापत झाली नाही.
या प्रकारा संदर्भात वादाविषयी परिसरातील काही व्यावसायिकांनी जिल्हा पेठ पोलिसांना माहिती दिली. त्या वेळी तेथे कर्मचारी पोहचले असता त्यांना कारचालक पसार होताना दिसल्याने त्यांनी पाठलाग केला. मात्र तो भरधाव वेगाने निघून गेला. मात्र हा संपूर्ण प्रकार बियरबार सह आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये कैद झाला आहे.आता वरिष्ठ पोलीस अधिकारी घडलेल्या या घटनेवर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे.