जळगाव जिल्ह्यातील दोन माजी मंत्री शरद पवारांची साथ सोडणार, तरीही ‘शरद पवार हेच आमचे दैवत’
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन माजी मंत्री शरद पवार यांची साथ सोडणार आहे. “विरोधात असल्यामुळे कामे होत नाहीत, कार्यकर्त्यांचा सत्तेत जाण्याचा आग्रह होता. त्यामुळे अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला,” या कारणाने माजी मंत्री डॉ. सतीश पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात डॉ. सतीश पाटील यांनी स्वतः या प्रवेशाबाबत माहिती दिली. ते ३ मे रोजी मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत. अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर त्यांनी प्रवेशाची तारीख निश्चित केल्याचे पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांना कल्पना दिली असून मात्र “शरद पवार साहेबांशी बोलण्याची हिंमत नाही, शरद पवार साहेबांनी मला खूप दिलं. त्यांच्याविरोधात माझी नाराजी नाही. अजित पवारांकडे गेलो तरी शरद पवार हेच माझे दैवत असतील,” असे ही सतीश पाटील म्हणाले. भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सत्ताधारी कार्यकर्त्यांना त्रास देतात आणि कामे होत नसल्याने कार्यकर्त्यांनी सत्तेत जाण्याचा आग्रह धरल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केली भूमिका स्पष्ट
तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनीही आपला प्रवेशाचा निर्णय घेतलेला आहे. निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यात कार्यकर्त्यांनी सांगितलं की, दहा वर्षे विरोधात राहिलो, आता आणखी पाच वर्षे काढणं शक्य नाही. सत्ताधाऱ्यांकडून त्रास होतो, त्यामुळे सत्तेत गेलं पाहिजे. अजित दादांच्या पक्षात प्रवेश करावा, अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती. तेव्हापासूनच यावर चर्चा सुरू झाली.
“विधानसभा निवडणुकीनंतरच मी अजित दादांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता, पण काही अडचणींमुळे तो लांबला. आता मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि अजित दादांसोबतच काम करणार,” असे ते म्हणाले.
माजी मंत्री डॉ. सतीश पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यां दोन्ही नेत्यांच्या या निर्णयामुळे जळगावच्या राजकारणात मोठी घडामोड होणार असून यांच्या या प्रवेशाने अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे. मात्र शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा