मोठी बातमी : यशवंत जाधवांच्या डायरीत आणखी दोन नावं : ‘M-TAI’ व ‘केबलमॅन’ कोण ?
मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वीच आयकर विभागाच्या तपासात जाधव यांची डायरी विभागाला सापडली आहे. या डायरीतील एका नोंदीमध्ये मातोश्रीला 50 लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला मातोश्रीला 2 कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आढळला होता. आता डायरीत आणखी दोन नावं असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यामुळे शिवसेना नेते यशवंत जाधव यांची डायरी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.
जाधव यांच्या डायरीत मातोश्री अशी नोंद असल्याने राजकारण तापलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराचे नावही मातोश्री असल्याने भाजप नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं होतं. डायरीत मातोश्रीच्या उल्लेखावरून चौकशी केली असता यशवंत जाधव यांनी हे घड्याळ त्यांच्या आईच्या वाढदिवसाला भेट दिल्याचे सांगितले. दुसरीकडे, गुढीपाडव्याला आईच्या स्मरणार्थ गरजूंना भेटवस्तू दिल्याचा खुलासा त्यांनी केला. पण त्यांच्या या खुलाशावर आयकरचे अधिकारी समाधानी नव्हते.
त्यानंतर आता या डायरीत आणखी दोन नावं असल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी पहिलं नाव ‘केबलमॅन’ असून त्याच्यासमोर एक कोटी 25 लाख रुपये दिल्याची नोंद आहे. तर दुसरं नाव ‘M-ताई’ हे असून त्यासमोर 50 लाख लिहिले असल्याची माहिती समोर आली आहे. ही दोन नावे म्हणजे नेमकं कोण, यावरून आता चर्चांना उधाण आलं आहे. यापैकी एक महिला व एक पुरूष असल्याचे स्पष्टपणे दिसते. पण या सांकेतिक नावांमुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापणार असल्याली शक्यता आहे.
यशवंत जाधव यांनी बीएमसीच्या ३० कोटी रुपयांच्या विविध कंत्राटांसाठी बिमल अग्रवाल यांची मर्जी राखल्याचा आयकर विभागाला संशय आहे. जाधव यांच्या पत्नी आणि मुंबईतील भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांनी 2019 मध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. यात कोलकाता येथील प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून झालेल्या व्यवहाराची माहिती प्राप्तिकर विभागाला या शपथपत्रातून मिळाली होती. जाधव आणि कुटुंबीयांना भायखळा येथील इमारत खरेदीसाठी सुमारे १५ कोटी रुपये कंपनीने दिले होते. जाधव कुटुंबीयांनी नंतर हे पैसे कंपनीला परत केले, जे नंतर कंपनीने न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित केले.