जळगाव जिल्ह्यातील दोन सरपंच व एक ग्रामपंचायत सदस्य अपात्र
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l कर्तव्य कसून केल्या प्रकरणी जामनेर तालुक्यातील वाकोद येथील सरपंच याना अपात्र ठरविण्यात आले आहे. सरपंच यांनी उपसरपंचपद भरण्यात कर्तव्य कसून केल्याने सरपंचपदावरून अपात्र करण्यात आल्याचा निकाल विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी काढले.
जामनेर तालुक्यातील वाकोद येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच रविंद्र भगवान भगत यांची निवड २०२१ साली कायदेशीर करण्यात आली होती. व वाकोद ग्रामपंचायतीचे ११ सदस्य अपात्र संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील काही अर्ज मंजूर होऊन काही अर्ज अंतिम निकालासाठी बाकी होते. त्यानुसार काही सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती. दरम्यान उपसरपंच रविंद्र भगत यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे सिध्द झाल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार २९ मे २०२३ रोजी पदावरून अपात्र केले होते. तेव्हा पासून उपसरपंचपद रिक्त होते.
३० दिवसाच्या आत उपसरंपच पदाचे रिक्तपद भरण्याचे आवश्यक असतांना सरपंच सरला सपकाळे यांनी कर्तव्यात कसूर केल्याने गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेले उपसरपंचपद भरलेले नाही. याला सरपंच सरला सपकाळे हे जबाबदार असल्याचे ठरवून अपात्र करावे असा अहवाल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आला. या अवहवालाचे अवलोकन केल्यानंतर नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी सरपंच सरला संजय सपकाळे यांना अपात्र करण्याचा निकाल दिला आहे. मुळ तक्रार अर्चना दिपक गायकवाड यांनी दिली आहे. त्यांच्यातर्फे ॲड.विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले. या कारवाईमुळे जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दुसरी घटना बोदवड तालुक्यातील मानमोडी येथील
संजय सखाराम पाटील यांनी सरपंच सौ. पूनम मोहन पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य धनराज रामू भील यांच्या विरोधात या दोन्ही जणांनी सरकारी मालकी असणाऱ्या जागेवर अतिक्रमण करून रहिवास केल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे
तक्रार दाखल केली होती. त्या संदर्भात सरपंच, आणि एक ग्रामपंचायत सदस्याला अपात्र करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
संदर्भातील वृत्त असे की, बोदवड तालुक्यातील मानमोडी येथील संजय सखाराम पाटील यांनी सरपंच सौ. पूनम मोहन पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य धनराज रामू भील यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. या दोन्ही जणांनी सरकारी मालकी असणाऱ्या जागेवर अतिक्रमण करून रहिवास केल्याचे दिसून आल्यामुळे सदर तक्रार दाखल करण्यात आली होती.
यात सरपंच पूनम पाटील या कुटुंबियांसह त्यांचे सासरे कै. भावलाल फकीरा पाटील यांनी ग्रामपंचायतीची मालकी असणाऱ्या जागेवर (मालमत्ता क्रमांक २८८) जेथे अतिक्रमण केले होते तेथे शेती अवजारे, चारा ठेवण्यासाठी वापर करत असल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले होते. तर धनराज रामू भील यांनी शासकीय अनुदानातून बांधण्यात आलेल्या घरकुलात १० चौरस फुट जास्तीचे बांधकाम करून, तसेच घरकुलाला लागून पत्र्याचे शेड तयार करून नियमांचा भंग केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आलेले होते. तसेच या घरकुलात नियमानुसार शौचालय बांधण्यात आले नसून धनराज भील व त्यांचे कुटुंब हे उघड्यावर शौचास जात असल्याचे या तक्रार अर्जात नमूद करण्यात आलेले होते.
या प्रकरणी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निकाल दिला आहे. यात अर्जदार संजय सखाराम पाटील यांचा अर्ज ग्राह्य धरून मानमोडीच्या सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्या सौ. पूनम मोहन पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य धनराज रामू भील यांना अपात्र करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी तक्रारदार संजय सखाराम पाटील यांच्या वतीने ॲड. विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा