दुचाकी चोराला अटक, तीन दुचाकी जप्त
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्यामध्ये पोलिसांनी रावेर शहरातील छोरीया मार्केट परिसरातून एका १९ वर्षीय संशयित आरोपीला शिताफिने अटक करून रावेर पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यातील आणि इतर दोन अशा दुचाक्या जप्त केल्या.
दि. २ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास चोरीस गेलेल्या दुचाकी चोरीची फिर्याद रावेर पोलीस स्टेशन मध्ये यश प्रकाश देशमुख (वय २१, रा. शिरूर दिगर ता. शहादा हल्ली मु. विद्यानगर, रावेर) यांनी दाखल केली होती.त्यांच्या या गुन्ह्याचा तपास सुरू होता. दरम्यान रावेर पोलीस स्टेशनला गोपनीय माहिती मिळाली की, त्या ठिकाणी एक १८ ते १९ वर्षाचा मुलगा दुचाकी चोरीसाठी आला आहे व तो सराईत चोर आहे, त्यानुसार त्यांनी रावेर शहरातील छोरीया मार्केट येथे बुधवारी दि. ३ जुलै रोजी सापळा रचला.
त्या ठिकाणी संशयित आरोपी जगराम यारसिंह बारेला (वय १९, रा. शहापूर ता. जि. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) हा मिळून आला. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले.गुन्ह्यात चोरीस झालेली दुचाकी आणि इतर आणखी दोन दुचाकी त्याने काढून दिल्या असून गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल, नाईक किशोर सपकाळे, समाधान ठाकूर, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे आदींच्या पथकाने केली आहे.