ब्रेकिंग : नेपाळ मध्ये बस नदीत कोसळली, १४ प्रवाशांना जलसमाधी,जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा समावेश
काठमांडू, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l पोखराहून काठमांडूच्या दिशेने भाविकांना घेऊन जात असताना महाराष्ट्रातील पर्यटकांची एक बस तनहून जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत कोसळली. यात १४ प्रवाशांना जलसमाधी मिळाली असून त्या बस मध्ये ४१ प्रवाशी होते.तर ड्रायव्हर क्लिनर सह ४३ जण होते.
महाराष्ट्रातील ४१ + २ (ड्रायव्हर,क्लिनर) पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात राज्यातील १४ प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. यामध्ये १६ पेक्षा जास्त जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात बस कोसळल्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक झाले आहे.
महाराष्ट्रातील एकूण ११० भाविक तीर्थयात्रेसाठी नेपाळला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. मृतांमध्ये एका बालकाचाही समावेश आहे. १६ पेक्षा जास्त जण जखमी आहेत. यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस पोखराहून काठमांडूला जात होती. यावेळी ती नियंत्रणाबाहेर जाऊन नदीत पडली. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील वरणगाव परिसरातील काही प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातावेळी ११० पर्यटकांच्या तीन बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात होत्या. त्यापैकी ४३ जण प्रवास करत असलेली बस नदीत कोसळली.
यूपी एफटी ७६२३ हा क्रमांक असलेली बस नदीत कोसळली. सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. नदीत पडल्यानंतर ती बस तरंगत नदीच्या काठावर आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस कार्यालय तनहुनचे डीएसपी दीपकुमार राया यांनी दिली आहे.