ब्रेकिंग : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा ३ महिने लांबणीवर
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकांच्या घोषणा होणार असताना या घोषणा होण्यापूर्वीच राज्यात काही जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या तारखा आता पुढे तीन महिने लांबणीवर ढकलण्यात आल्या आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचे कारण देत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने १ ऑक्टोबरपासून सुरु केलेल्या २९ हजार ४२९ सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर केला होता.मात्र राज्य सरकारने सोमवार दि.७ ऑक्टोबर रोजी सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर स्थगित करुन ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश जारी केले आहेत.
राज्यातील प्रलंबित असलेल्या सहकारी संस्थांपैकी ७ हजार १०९ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली होती. मात्र, राज्यातील २५० किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच ज्या प्रकरणी सर्वोच्च व उच्च न्यायालयाने सहकारी संस्थेची निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे, अशा सहकारी संस्था तसेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड बाकी आहे, अशा सहकारी संस्था वगळून अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचेही आदेशात नमूद केले आहे.