यावल तालुक्यात वृद्धाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
यावल, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील रहिवाशी दगडू चव्हाण या ७९ वर्षीय वृद्ध व्यक्तीने आडगाव रस्त्यावरील शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २६ ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी ९ वाजता घडली.
यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील दगडू काशीराम चव्हाण. वय ७९ वर्ष. या वृद्धाने आडगाव रस्त्यावरील शेत-विहिरीत अचानक उडी घेतली. हा प्रकार तेथील ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच शेतात धाव घेत त्यांना तातडीने विहिरीतून बाहेर काढले.
त्यांना लागलीच यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला दीपक चव्हाण यांनी दिलेल्या खबरी वरून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसल्याने अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास यावल पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका उमेश महाजन हे करीत आहेत.