आश्रम शाळेतील नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा चक्कर येऊन मृत्यू
यावल, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील मनवेल येथील आदिवासी आश्रम शाळेतील हिंगोणा येथील रहिवाशी असलेल्या नऊ वर्षांच्या विद्यार्थ्याला चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवार रोजी घडली.
यावल तालुक्यातील मनवेल येथील आदिवासी आश्रम शाळेत यावल तालुक्यातीलच हिंगोणा येथील फुलसिंग पहाडसिंग बारेला वय ९ वर्ष. हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. सोमवार दि.५ रोजी शाळेत सकाळी त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला. शिक्षकांनी तातडीने त्याला यावल येथील ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणीनंतर विद्यार्थ्याला मृत घोषित केले. नऊ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच खळबळ उडाली आहे.
आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी या बाबत सांगितले की, फुलसिंग बारेला याची रविवार दि. ४ रोजी तब्येत खराब होती. त्याच्यावर औषध उपचार करण्यात आले होते. त्यानंतर सोमवार दि. ५ रोजी सकाळी तब्येत आणखी खराब झाल्यानंतर यावल येथील रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू नेमके कशामुळे झाला याचे कारण शवविच्छेदनानंतरच समजणार आहे. कोणावर कारवाई करायची याबाबतचा निर्णय त्यानंतर घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान, फुलसिंग याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.