महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, फक्त सत्तेचे ‘भोगी’! उद्धव ठाकरेंना टोला देत राज ठाकरेकडून योगीचे कौतुक !
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : सध्या भोंग्याविरोधात राजकारण चांगले तापले असतांना महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी तीन मेपर्यंतचा अल्टीमेटम मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला आहे पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी भोंगे हटवण्यासाठी तातडीनं पावले टाकत सहा हजार भोंगे उतरवले आहेत. यामुळे आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, फक्त सत्तेचे ‘भोगी’! असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत राज ठाकरे यांनी योगींचे आभार मानले आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी बुधवारपर्यंत विविध धार्मिक स्थळांवरील सहा हजार भोंगे उतरवले आहेत. त्यानंतर ठाकरेंनी योगींचे आभार मानले आहेत. राज ठाकरे यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुध्दी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना, असं ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.
उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, धार्मिक स्थळांवरील परवानगी न घेतलेले भोंगे हटवण्याची मोहिम राज्यभर हाती घेण्यात आली आहे. तसेच इतर सर्व धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा मान्यतेप्रमाणे आवाज ठेवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तर 30 हजारांहून अधिक भोंग्यांच्या आवाजावर नियमानुसार निर्बंध लादले आहेत. याअंतर्गत बुधवार दुपारपर्यंत सहा हजार 31 भोंगे हटवण्यात आले आहेत. सर्वाधित 1366 भोंगे वाराणसी विभागातील असून त्यामध्ये मेरठ, बरेली आणि कानपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ यांनी मागील आठवड्यात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात योगींनी याबाबत निर्णय घेतला होता. प्रत्येकाला आपल्या पध्दतीनुसार पुजा करण्याचे स्वातंत्र्य आहे. पण त्याचा इतरांना त्रास होऊ नये, असं योगी यांनी म्हटलं होतं. दरम्यान, मुंबई पोलिसांनीही भोंग्यांबाबत नियमावली तयार केली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मुंबई पोलिसांकडून मशिदी आणि मंदिरांना सुचना करण्यात आल्या असून दिलेल्या सुचनाचे पालन न झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.