राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, काय म्हणतंय हवामान विभाग
पुणे,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. काही ठिकाणी यलो, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. १० जुलैपर्यंत बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार असून राज्यात ११ जुलैपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील इतर भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबईसह परिसरात देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईच्या अनेक भागांमध्ये रिमझिम पाऊस कोसळतोय. दादर, कल्याण, डोंबिवलीकरांना पावसाची संततधार अनुभवायला मिळतेय. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. उद्या, ९ जुलैलासुद्धा मुंबईला पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून याठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुण्यात ढगाळ वातावरण असून काही भागात पाऊसही झाला.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात पुढचे २ दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होईल. इथं वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी असेल.
विदर्भाला हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला आहे. इथल्या बहुतांश भागात पुढचे ५ दिवस पावसाची शक्यता आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तविली आहे. राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतोय. तर, काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जातेय. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा