काय.. हिम्मत? मुख्यमंत्र्याच्या “लाडक्या बहिणीच्या” दाखल्या साठी ४०० रुपयांची लाच..!
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l केव्हा कोण काय हिम्मत करेल हे सांगताच येत नाही. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीच्या दाखल्या साठीही लाच मागायला मागे पुढे पाहात नाही. एकाने तर चक्क राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीच्या दाखल्यांसाठी लाच मागितली. त्याची काय..हिम्मत.
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजने करीता शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी ४०० रुपये लाच स्वीकारताना प्रयोगशाळा सहायकाला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांची बहीण ही इयत्ता अकरावी व बारावी शिक्षणासाठी सन २०१२- २०१३ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तोगरी, ता.उदगीर जी लातूर. मध्ये शिक्षण घेत होती. सन २०१३ मध्ये तिचे लग्न झाल्यानंतर तेव्हापासून ती मौजे मालेवाडी ता.गंगाखेड जि.परभणी येथे सासरी राहण्यास आहे.
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरिता तक्रारदार यांच्या सख्ख्या बहिणीस तिचा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक होता, म्हणून तिचा शाळा सोडल्याचा दाखला मिळणे बाबतचा विनंती अर्ज तक्रारदार भाऊने याने ०८ जुलै २०२४ रोजी शाळेतील कार्यालयात दिला होता.
तक्रारदार यांनी दि.१२ जुलै रोजी शाळेत जाऊन त्यांचे बहिणीचा शाळा सोडल्याचा दाखला कधी मिळेल असे विचारले असता प्रयोग शाळा सहायक जयप्रकाश बिराजदार यांनी ४०० रुपये घेऊन या व दाखला घेऊन जा असे सांगितले. तक्रारदार यांनी त्यांच्या बहिणीचे संमतीने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर येथे लेखी तक्रार दिली.
लाच लुचपत पथकाने मंगळवारी शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी बिराजदार यांनी तक्रारदार यांच्याकडे ४०० रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य केले. लाचेची रक्कम पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तोगरी, ता.उदगीर येथील कार्यालयात स्वीकारताना जयप्रकाश बालाजी बिरादार. वय ४५ वर्ष. रा.विकास नगर, देगलूर रोड, उदगीर ता.उदगीर जि.लातूर. प्रयोगशाळा साहायक. याला रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीवर देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक संतोष बर्गे व त्याच्या पथकाने केली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा