काय म्हणतो “एक्झीट पोल” रावेर – जळगाव मधून कोण येणार निवडून?
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लोकसभा निवडणुकीचे मतदान संपले. आता प्रतिक्षा निकालाची, कोणत्या मतदार संघातून कोण उमेदवार निवडून येणार? अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. आता नुकताच एक्झीट पोल जाहीर करण्यात आला. जाहीर करण्यात आलेल्या दोन एक्झीट पोल रावेर आणि जळगाव या दोन्ही जागांवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची सरशी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जनतेचा मुड काय?
शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर विविध वेगवेगळे एक्झीट पोल्स समोर आले आहेत. काही एक्झीट पोल्स मध्ये मोठी तफावत आहे.परंतु काहीही असलं तरी एकंदरीत पंतप्रधान पदी भाजपचाच उमेदवार म्हणजेच नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल. असा अंदाज एक्झीट पोल्स सांगतात. tv 9 या वाहिनीसह ABP -C व्होटरचे अंदाज जाहीर करण्यात आलेले आहेत. यानुसार देशात पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तारूढ होणार असल्याचे अंदाज बहुतांश एक्झीट पोल्सने जाहीर केले आहे. यात भाजपला काही राज्यांमध्ये फटका बसणार असला तरी काही राज्यांमध्ये ही भर निघणार असल्याचे नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधान होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
महाराष्ट्राचं काय?
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या मध्ये जोरदार काट्याची टक्कर होणार असल्याचे संकेत मिळाले होते. आणि झालेही तसेच. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत राज्यात महायुतीला २३ तर महाविकास आघाडीला २४ जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. व एक अपक्ष असे अंदाज वर्तविला आहे.
रावेर व जळगाव च्या मतदारांचा मुड काय?
रावेर व जळगाव दोन्ही जागांमध्ये मोठ्या चुरशीची लढत पाहायला मिळाली. झालेल्या या अतिशय चुरशीच्या लढतीत रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदार संघात मतदारांनी भाजपला कौल दिल्याचे एक्झीट पोल सांगतोय. या एक्झीट पोलमध्ये रावेर लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या भाजपच्या रक्षा खडसे या विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून जळगाव लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ या विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा केवळ अंदाज असून घोडा मैदान जवळचं आहे. कोण बाजी मारेल, येत्या ४ जून ला निकाल आहे.