‘रक्षकच जेव्हा भक्षक होतात तेव्हा,’ पोलिसांना पब्लिक चोप.… नेमकं घडलं तरी काय…
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l पोलीस कर्मचाऱ्यांनी एका युवतीला छेडल्याचा प्रकार उघडकीस आला.
” रक्षकच जेव्हा भक्षक होतात तेव्हा” नागरिकांमध्ये असुरक्षिततेची आणि सोबतच संतापाची लाट उसळते . या प्रकारानंतर नागरिकांनी त्यांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. सध्या त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला असून ही घटना मात्र पोलिस पेशाला काळीमा फासणारी आहे.
देवगड एसटी स्टॅण्डमार्गे आपल्या घरी परतणाऱ्या एका युवतीची छेडछाड, विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरिराम मारुती गिते. वय ३३ वर्ष, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड. याच्यासह माधव केंद्रे, सटवा केशव केंद्रे, श्याम गिते, शंकर गिते,प्रवीण रानडे या सहा संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांमध्ये चारजण पोलीस सेवेत आहेत. ही घटना २४ सप्टेंबर रोजी संध्यकाळी ५. ३० वाजेच्या सुमारास घडली.
नांदेड येथून देवगड येथे इनोव्हा कार घेऊन पर्यटनासाठी आलेले हरिनाम गिते, माधव सुगराव केंद्रे,सटवा केशव केंद्रे,श्याम बालाजी गिते,शंकर संभाजी गिते,प्रवीण विलास रानडे हे मंगळवारी सायंकाळी एसटी स्टॅण्डमार्गे देवगड बाजारपेठेच्या दिशेने जात होते. याचमार्गे पीडित युवती ही आपल्या घरी परतत होती. या रस्त्यावरील आनंदवाडी येथे जाणाऱ्या मार्गावरील वळणाच्या ठिकाणी संशयित आरोपींनी युवतीला पाहून कार थांबवली.
कारमधील हरिनाम गिते याने पीडित युवतीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिचा हात पकडून ‘माझ्यासोबत येतेस का?’तुला वसई फिरवतो’,असे विचारले. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून संशयित माधव केंद्रे, सटवा केशव केंद्रे, श्याम गिते, शंकर गिते,प्रवीण रानडे या संशयितांनी पीडित युवतीकडे पाहून टिंगलटवाळी केली. ‘तिला गाडीत घे,नंतर काय ते बघू’असे बोलून पीडित युवतीला गाडी मधून घेऊन जाण्याच्या इराद्याने व बेकायदेशीर कोंडून ठेवण्याची व गंभीर इजा पोहोविण्याच्या उद्देशाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
यातील चार जण हे पोलीस कर्मचारी असून पोलीस कर्मचाऱ्यांना काळीमा असणारी ही घटना आहे. हे पोलिस कर्मचारी नांदेड येथून देवगड येथे फिरायला आले होते. या घटने दरम्यान तेथील ग्रामस्थ व महिलांनी छेड काढणाऱ्या पोलिसाना रस्त्यावर बसवून यथेच्छ चोप दिला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे
पिडीत युवतीने या संदर्भात देवगड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून संशयित हरिनाम गिते,माधव सुगराव केंद्रे, सटवा केशव केंद्रे, श्याम बालाजी गिते,शंकर संभाजी गिते, प्रवीण विलास रानडे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयितांना देवगड पोलिसांनी देवगड न्यायालयासमोर हजर केले.न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा