दुचाकी चालवताना नायलॉन मांजा ने गळा चिरला, गळ्याला पडले ७५ टाके
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉनचा मांजा हा दिवसेंदिवस घातक ठरताना दिसत आहे. कित्येक वर्षांपासून मकरसंक्रातीपासून पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे. राज्यात नायलॉन मांजावर बंदी असताना देखील मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. या नायलॉन मांजामुळे एका २५ वर्षीय तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. या नायलॉन मांजामुळे तरुणाच्या गळ्यावर तब्बल ७५ टाके पडले आहेत. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी सापडले दररोज मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे.याच घातक नायलॉन मांजामुळे नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय मुशरन सय्यदला गंभीर इजा झाली आहे.
या घटनेत मुशरन सय्यदचा गळा चिरला गेल्याने त्याच्या गळ्याला ७५ टाके पडले आहेत. त्याच्यावर नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नायलॉन मांजामुळे त्याच्या गळ्यापासून ते आतमध्ये असलेली मुख्य रक्तस्त्राव करणारी वाहिनीला चिर पडली. मात्र तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने दैव बलवत्तर म्हणून तो मृत्यूच्या दारातून परत आलाय.
मुशरन सय्यद हा तरुण नाशिक शहरातील एका कपड्याच्या दुकानात काम करीत असून हा तरुण दुचाकीवरून घरी येत होता. त्यावेळी त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला आणि तिथेच चिरला गेला. त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत तो रस्त्यावरच कोसळला. त्याच अवस्थेत नागरिकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यानंतर त्याला एका दुसऱ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्यावर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्याला जीवदान मिळाले.
जखमी तरुणाच्या आईने या संदर्भात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली असून नायलॉन मांजामुळे फक्त मानवासच नव्हे तर पशु पक्ष्यांना देखील इजा होत आहे. यात अनेक पशुपक्षी देखील मृत्यूमुखी पडले आहेत.
पतंग बाजी करताना नायलॉन मांजाचा वापर करून पतंगबाजीचा आनंद घेण्याच्या उत्साहात अनेक जण जखमी होत आहेत. नायलॉन मांजा विक्रेत्यांसह वापरणाऱ्यावर कारवाई करावी तसेच मांज्या उत्पादकांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा