जिल्हाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी? शरद पवार गटातील अंतर्गत वाद उफाळला, रवींद्रभैय्या पाटील यांचा राजीनामा
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l काल राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार गटाची जळगाव जिल्हा बैठक झाली. या बैठकीत रावेर लोकसभा मतदार संघात शरद पवार गटाचे उमेदवार यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला.अशा अनेक महत्वाच्या कारणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस- शरदचंद्र पवार पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आले त्यात जिल्हाध्यक्ष व जळगाव महानगराध्यक्ष यांच्या राजीनाम्याची मागणी करून जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्षांचा बैठकीतच राजीनामा घेण्याचा ठरावच संमत करण्यात आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा मोठ्या मतांच्या फरकाने दारूण पराभव झाला. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हा बैठक झाली. यातच पक्षातील अंतर्गत कलह अनेकदा अधोरेखीत झाला असतांनाच आता जिल्हा बैठकीत दोन्ही जिल्हाध्यक्षांचा राजीनामा घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तर डॉ. सतीश पाटील यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतांना आगामी काळातील निवडणुक लक्षात घेता जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील व महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी राजीनामा देण्याचा ठराव मंजूर करून घेतला. याप्रसंगी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, अरूणभाई गुजराथी, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र पाटील यांच्यासह अन्य नेते व पदाधिकार्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जामनेरचे डॉ. मनोहर पाटील यांनी पक्षाच्या नेत्यांना खडे बोल सुनावले. याप्रसंगी पक्षाचे जिल्हा निरिक्षक प्रसन्नजीत पाटील यांची देखील उपस्थिती होती.
येत्या काही महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. दरम्यान, डॉ. सतीश पाटील यांनी एक जिल्हाध्यक्ष व दोन कार्याध्यक्ष नेमावेत अशी सूचना देखील याप्रसंगी केली. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.