तहसीलदार पदावर नोकरी लावून देण्याचे प्रलोभन देत महिलेची महिलेकडून साडे दहा लाखात फसवणूक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | मुलीला तहसीलदार म्हणून नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवत महिलेची आर्थिक फसवणूक केल्याची घटना जळगाव शहरातील नेहरूनगर परिसरात घडली.
जळगाव शहरातील नेहरूनगर परिसरातील कल्पना आत्माराम कोळी (वय-५३, रा.नेहरूनगर जळगाव) या महिलेच्या घरातील दागिने मोडून आलेले रुपये,व घरातील रोकड तसेच शासकीय योजनेचे अर्ज भरून गोळा झालेले पैसे असे एकूण तब्बल १० लाख ५३ हजार ९५० रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कल्पना आत्माराम कोळी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात ज्योती अशोक साळुंखे (रा.मन्यारवाडा जळगाव) या महिलेविरोधात तक्रार दाखल केली असून महिले विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना कोळी यांची ज्योती साळुंखे नावाच्या महिलेशी एका कार्यक्रमात ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यावर ज्योती साळुंखे हिने कल्पना कोळी यांना त्यांच्या मुलीला वैशाली कोळीला तहसीलदार म्हणून नोकरीला लावून देण्याचे प्रलोभन दाखवले. यावर विश्वास ठेवून कल्पना कोळी यांनी वेळोवेळी ज्योती साळुंखे यांना एकूण ४ लाख २२ हजार रुपये रोख दिले. त्यानंतर आणखी पैशांची मागणी झाल्यावर कल्पना कोळी यांनी आपल्या घरातील ३ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिनेही ज्योती साळुंखे यांच्या हवाली केले. इतकेच नव्हे, तर ज्योती साळुंखे हिने कल्पना कोळी यांची मुलगी वैशाली कोळी यांनाही शासकीय योजनेच्या अर्ज भरण्याच्या कामात गुंतवून एका अर्जामागे १०० रुपये मिळतील, असे सांगून वैशाली यांच्याकडून तब्बल ५६० लोकांकडून अर्ज भरून घेतले आणि त्यापोटी जमा झालेले ३ लाख ५१ हजार ९५० रुपये स्वतः घेतले. अशा प्रकारे ज्योती साळुंखे हिने कल्पना कोळी आणि त्यांच्या मुलीकडून एकूण १० लाख ७३ हजार ९५० रुपये उकळले.
कल्पना कोळी यांनी सदर महिलेकडे वेळोवळी विचारणा केली असता ज्योती साळुंखे या महिलेने कल्पना कोळी यांना पैसे देण्यास स्पष्ट नकार देत शिवीगाळ करत “माझी वरपर्यंत पोहोच आहे, तुम्ही जर माझ्याकडे आलात तर तुमचे हातपाय तोडून तुम्हाला संपवायलाही कमी करणार नाही,” अशा शब्दांत धमकी दिली.
शेवटी आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने हताश झालेल्या कल्पना कोळी यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनला ज्योती अशोक साळुंखे यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र तावडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.