पोलिस असल्याची बतावणी करत महिलेचे २ लाख ६५ हजारांचे दागिने लांबविले
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकीवर जाणाऱ्या दोघांचा रस्ता अडवत दोघं भामट्यानी महिलेला आम्ही पोलिस असून या रस्त्याने आताच एका म्हातारीला लुटले असे सांगत महिलेजवळील दागिने रूमालात ठेवण्याचे सांगून हातचालाखीने २ लाख ६५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना ५ डिसेंबर गुरूवार रोजी सकाळी ९ वाजता दीपनगर येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाजवळील बसस्थानकाजवळ घडली.
गुरुवारी दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता
वसंत जगन्नाथ पाटील (वय-१९, रा.आदर्श गल्ली भुसावळ) हे महिलेसह दुचाकीने दिपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्राजवळील बसस्थानका जवळून जात असताना अज्ञात दोन व्यक्तींनी त्यांचा रस्ता अडवून त्यांना थांबवून “आम्ही पोलीस आहोत, तुम्हाला सिटी मारली, तुम्ही थांबले का नाहीत? आताच या रस्त्याने म्हातारीला लुटलेले आहे, तुम्ही काय एवढे सोने घालून फिरत आहेत. ते काढा,” असे सांगून वसंत पाटील व महिलेचा विश्वास संपादन करून त्यांनी सोने व कागदपत्रे रूमालात बांधण्याचे सांगितले.
पोलिस असल्याचा विश्वास ठेऊन दोघांना महिलेने अंगावरील सोने काढून रूमालात ठेवले. व “तुमचे सोने डिक्कीत ठेवून देतो” असे सांगत हातचालाखी करून नकली पोलिसांनी तब्बल २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविण्याची धक्कादायक घटना घडली. सोने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर वसंत पाटील यांनी तातडीने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती देऊन तक्रार दिली. त्यानुसार त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स पो नि नंदकिशोर काडेकर करीत आहे.