लाचार हफ्तेखोर पोलिसांच्या कारभारामुळे मुक्ताईनगरात चुकीच्या घटना– आ. एकनाथ खडसे यांचा आरोप
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मुक्ताईनगर येथे एका तरुणीसह तिच्या कुटुंबियांचे सहलीचे फोटो चुकीचे संदर्भ देवून व्हायरल केल्याच्या आरोप करत नगरसेविका पुत्राला मारहाण केल्याच्या प्रकरणावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. नगराध्यक्षपदाची निवडणूक रद्द झाल्याच्या संतापातून माझ्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. तसेच त्यांनी पोलिसांवरही तशोरे ओढत ‘लाचार आणि हप्तेखोर पोलिसांमुळेच’ मुक्ताईनगर शहरात अशा प्रकारच्या चुकीच्या घटना घडत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुक्ताईनगर पोलिसांमुळे गुंडागर्दी वाढली असून लाचार आणि हप्तेखोर पोलिसांमुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहे, या गुंडांचे अवैध धंदे असल्याने आणि ते पोलिसांना हप्ते देत असल्याने या गुंडावर पोलीस कारवाई करत नसल्याचेही खडसे यांनी सांगितलं. मुलीच्या फोटोवर चुकीचे संदर्भ टाकल्याचा आरोप करत मुलीसह तिच्या आईने नगरसेविकेच्या पुत्राला मारहाण केल्याची घटना आज घडली. हा नगरसेविकापुत्र खडसे समर्थक असून यावरून एकनाथ खडसेंनी पोलिसांच्या कारभारावर संताप व्यक्त केला .
आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, आज मुक्ताईनगरात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला स्थगिती मिळाली. त्याच्याच रागातून आज माझ्या कार्यकर्त्याला महिलेसह जमावाने मारहाण केला. मुक्ताईनगरात संबंधित गुंडांकडून नेहमी अशाच प्रकारच्या घटना घडत असून या गुंडांवर कठोर कार्यवाहीसाठी लवकरच औरंगाबाद खंडपीठात दावा दाखल करणार असल्याचेही यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितले.
दरम्यान, मुक्ताईनगर येथील नगरसेविका पुत्रास मारहाण केल्या प्रकरणी पोलीस या घटनेची चौकशी करीत आहेत, चौकशी अंती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली आहे