दुकाना समोरील ४० हजाराची थैली लांबविली
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। किनगाव येथील भुसार मालाच्या व्यापार्याच्या दुकानातून भरदिवसा चाळीस हजार रूपयांची थैली लांबविल्याचा प्रकार आज घडला सर्वांसमोर भामटेगिरी करणार्यांचे कृत्य सीसीटिव्हींमध्ये कैद झाले असून आता पोलिसांचा तपास सुरू आहे.
किनगाव येथे नरेंद्र पाटील यांच्या मालकीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाच्या परिसरात साई ट्रेडर्स हे भुसार मालाचे दुकान आहे. आज दुपारी दोन चोरटे त्यांच्या दुकानासमोर आले. त्यांनी थोडा वेळ उभे राहून टेहळणी केली. नंतर एकाने क्षणार्धात बाहेर ठेवलेली पिशवी उचलून पोबारा केला. नंतर त्याचा साथीदारही गायब झाला. या थैलीमध्ये ४० हजार रूपये असल्याची माहिती दुकानदारांनी दिली. अवघ्या काही क्षणांमधील हा थरार सीसीटिव्हीत कैद झाला आहे.
या सीसीटिव्हीच्या फुटेजनुसार दोन्ही चोरटे तरूण दिसून येत आहेत. सीसीटिव्हीमध्ये त्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसून आल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोलीस लवकरच पोहचण्याची शक्यता आहे. यावलचे उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार यांनी सहकार्यांसह घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.