बैलगाडीसह विहिरीत पडल्याने शेतमजुरांसह बैलांचा मृत्यू!
फैजपूर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। काल १४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजे दरम्यान बामणोद शिवारात शेतमजूर बैलगाडीसहीत विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी फैजपूर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विश्वनाथ रामसिंग सोनवणे (वय-६५) रा. हातेड ता. चोपडा ह.मु. बामणोद ता. यावल असे मयत झालेल्या शेतमजूराचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, सुरेश टिकाराम भंगाळे रा. बामणोद ता. यावल यांच्या शेतात शेतमजूर विश्वनाथ सोनवणे हे शेताच्या कामाच्या निमित्ताने बामणोद शिवारात १४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता बैलगाडीने गेले होते. दरम्यान रात्रीच्या वेळी शेतात बैलगाडीने जात असतांना अंधाऱ्यात विहिर न दिसल्यामुळे बैलगाडीसह ते पाण्यात पडले. यात एक बैल आणि विश्वनाथ सोनवणे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सकाळी ८ वाजेच्या सुमारास निदर्शनास आले याप्रकरणी फैजपूर पोलीस स्थानकात सुरेश टिकाराम भंगाळे रा. बामणोद यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.