म्युनिसिपल हायस्कुलच्या मुख्याध्यापकाची मान्यता रद्द झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
फैजपूर ता.यावल (प्रतिनिधी)। माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी येथील नगरपालिका संचालित म्युनिसिपल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एल. आगळे यांची मुख्याध्यापक पदाची मान्यता रद्द केल्याने शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे .
याबाबत अधिक असे की, वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांच्या कडे तत्कालीन मुख्याध्यापक किशोर तळेले यांच्याकडून शाळेतील कारभारा विषयी तक्रारी करण्यात आल्या होत्या त्याची दखल तब्बल ५ वर्षा नंतर घेत आर. एल. आगळे यांना तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी दि १७ ऑक्टोबर २०१६ च्या पत्रानुसार सेवा जेष्ठतानुसार कायम मुख्याध्यापक पदाची मान्यता २१ जानेवारी रोजी जळगावचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी रद्द करत नव्याने मुख्याध्यापक पदाची निवड प्रक्रिया पालिका प्रशासनानाकडुन राबवण्यात यावी व पदावर पात्र कर्मचार्यांची पदोन्नतीने नियुक्त करून तसा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवावा या संदर्भातील आदेश देण्यात आले आहे.
या प्रकरणावर वरिष्ठ अधिकार्यांकडे खोट्या व दिशाभूल तक्रारी करण्यात येऊन माझी मुख्याध्यापक पदाची मान्यता रद्द करण्यात आली असून यासंदर्भातील निर्णया विरुद्ध मी न्यायालयात दाद मागणार असून सेवाज्येष्ठता नुसार मुख्याध्यापक पदावर माझाच दावा असून त्या नुसारच मुख्याध्यापक पदी माझी नियुक्ती करण्यात आली असल्याचे आर.एल. आगळे यांचे म्हणणे आहे. मात्र, म्युनिसिपल हायस्कुलच्या इतिहासात प्रथमच मुख्याध्यापक पदाची मान्यता रद्दची घटना घडली आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.