महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग, यावल पोलीस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल !
सुरेश पाटील
यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील किनगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानात तथा घरात अनाधिकारे प्रवेश करून लज्जास्पद कृत्य करून विनयभंग केल्याच्या कारणावरून 2 जणांसह 30 ते 35 जणांच्या विरुद्ध फिर्याद दिल्यावरून यावल पोस्टेला दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे यावल तालुक्यात शासकीय सामाजिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील किनगांव येथील प्रा.आ. केंद्रातील महिला आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. मनीषा लालचंद महाजन वय 30 यांनी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 30 जुलै 2020 गुरुवार रोजी संध्याकाळी 19:15 वाजेच्या सुमारास किनगांव खु. ग्रामपंचायत उपसरपंच शरद अडकमोल, दामू सिताराम साळुंके व त्यांची पत्नी व 2 मुली व इतर 30 ते 35 लोक सर्व राहणार किनगांव यांनी माझे राहते घरात अनधिकारे प्रवेश करून डिलिव्हरी पेशंटला घेऊन जाण्यासाठी ॲम्बुलन्स वाहन द्या असे बोलला असता मी सांगितले की तुम्ही आधी घराबाहेर चला मी ड्रायव्हरला फोन करते असे म्हटल्याने तो घराबाहेर गेला व बोलला की थांब तुला दाखवतो. माझे मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला व त्यास मी हटकले असता त्याने त्याच्या सोबत सिताराम साळुंके व त्याची पत्नी व 2 मुले व इतर 30 ते 35 लोकांना दवाखान्यात आणून शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या कारणावरून यावल पो. स्टे. भाग-5 गुन्हा र.नं. 29 /2020 कलम 353,354, A 1 ( 1 ) 452, 351,143, 147, 149 , 294 , 504 , 506, 186 , 135 प्रमाणे 2 जणांसह 30 ते 35 जणांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या आदेशान्वये पी.एस.आय. जितेंद्र खैरनार हे करीत आहेत.