यावल तालुक्यात अवैध वाळू साठा;साकळी परिसरातील सर्कल आणि तलाठी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष !
सुरेश पाटील
यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील साकळी मंडळात थोरगव्हाण, मनवेल परिसरात रस्त्याच्या बाजुला ठिक- ठिकाणी अवैद्य वाळू साठे आढळून आल्याने यावल तहसीलदार यांच्या आदेशान्वये वाळू साठ्यांचा पंचनामा करण्यात आला असून वाळू लिलावाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. तालुक्यातील मनवेल थोरगव्हाण परिसरात जुने गावठाण जवळ 20 ब्रास, दादाजी मंदिराजवळ 22 ते 25 ब्रास, स्मशानभूमीजवळ 5 ते 7 ब्रास असा एकूण 50 ते 55 ब्रास अवैध वाळू साठा आढळून आला असल्याची माहिती यावल तहसील कार्यालयातून मिळाली.
याबाबत संबंधित सर्कल यांच्याशी आज दिनांक 7 शुक्रवार रोजी सकाळी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता थोरगव्हाण शिवारातून 36 ब्रास अवैध वाळू साठ्याचा पंचनामा करण्यात आला असल्याची माहिती दिली. वाळू साठा पंचनामा बाबत यावल तहसीलदार यांच्याकडे अहवाल सादर केला जाणार असून पुढील निर्णय तहसीलदार जितेंद्र कुंवर घेतील अशी माहिती सर्कल कडनोर यांनी दिली. साकळी परिसरातून शेकडो ब्रास अवैध गौण खनिजाचासह अवैध वाळू वाहतूक खुलेआम सर्रासपणे सुरू असल्याचे बोलले जात असून याबाबत परिसरातील सर्कल आणि तलाठी यांचे वाळू वाहतूकदारांशी अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे वाळू वाहतूकदारांवर कारवाई होत नसल्याचे थोरगव्हाण मनवेल शिरागड परिसरात ग्रामस्थांमध्ये बोलले जात असून याबाबत जिल्हास्तरावर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी गेल्यामुळे अवैध वाळू चे पंचनामा करण्यात आल्याचे सुद्धा बोलले जात आहे. सार्वजनिक तथा शासकीय जागेवर अवैध वाळू साठे कोणाचे आहेत ? पंचनामा करताना ग्रामस्थांनी हे अवैध साठे कोणाचे आहेत याबाबत काही माहिती देऊन वाळू साठा करणाऱ्यांची नांवे दिली आहेत का ? परिसर परिसरातून अवैध वाळू वाहतूक कोण कोणकोणत्या वाहनातून करीत असतात याबाबत गांवचे पोलीस पाटील, तसेच तलाठी, सर्कल यांना माहिती नाही का ? ईत्यादी अनेक प्रश्न साकळी परिसरात उपस्थित केले जात आहेत. याप्रमाणे काल दिनांक 6 गुरुवार रोजी रात्री भालशिव- पिप्रि परिसरातून यावल तहसील विभागातील पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी यावल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे यावल तहसीलदार त्या ट्रॅक्टर मालकावर काय दंडात्मक कारवाई करतात याकडे सुद्धा लक्ष वेधून असुन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.