यावल तालुक्यातील निंबादेवी धरणात दोन बालके बुडाली, एकाचा मृतदेह मिळाला, दुसर्याचा शोध सुरू
यावल, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील पर्यटना साठी प्रसिद्ध असलेल्या निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेली दोन बालके बुडाली असून यातील एक मृतदेह मिळाला असून दुसर्याचा अद्याप शोध सुरू आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील निंबादेवी धरण हे आपल्या निसर्गसौदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटकांची वर्दळ असते. तर सध्या कडाक्याचे उन पडत असल्याने अनेक जण यात पोहण्यासाठी येऊन पोहण्याचा आनंद घेत असतात. तसेच पोहण्याचा आनंद घेण्यासाठी तालुक्यातील सावखेडासीम गावाजवळच्या आदिवासी वस्तीवरील नेनू किसान बारेला ( वय १०) आणि आसाराम शांतीराम बारेला ( वय १४) हे काल सायंकाळी धरणावर आंघोळी साठी गेले होते.
पोहण्यासाठी ही दोन्ही बालके पाण्यात उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने परिणामी दोन्ही जण यात बुडाले. ही माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा शोध सुरू केला. यात आसारामचा मृतदेह आढळून आला असला तरी नेनूचा अजून शोध लागला नाही. रात्री उशीरापर्यंत ही शोध मोहिम सुरू होती. तर, दोन बालकांच्या मृत्यूमुळे आदिवासी वस्तीसह परिसरावर शोककळा पसरली आहे.