तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच संशयितांना अटक, यावल तालुक्यातील घटना
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। २३ वर्षीय तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी यावल तालुक्यातील चितोडा येथील पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व पाच संशयीतांना यावल पोलिसांनी गुरूवारी अटक केली.
यावल तालुक्यातील चितोडा, येथील दुर्गेश संतोष किनगे वय २३ वर्ष या तरुणाला गावातील रजनी भास्कर जंगले, भास्कर आनंदा जंगले, रेखा भूषण जंगले, भूषण भास्कर जंगले व ज्ञानेश्वर भास्कर जंगले (सर्व राहणार चितोडा, ता.यावल) या पाच जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली होती व तू गाव सोडून निघून जा, तू जर गेला नाही तर आम्ही तुला सोडणार नाही, असे सांगून त्याला दम दिला होता व सातत्याने हे पाच जण त्याला त्रास देत होते. आरोपींच्या जाचाला कंटाळून मानसिक त्रासातून दुर्गेश संतोष किनगे याने दिनांक २८ सप्टेंबर रोजी देविदास तुकाराम पाटील रा.चितोडा. यांच्या शेत गट क्रमांक ५५७ मधील शेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती.
संतोष किनगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिस स्टेशनला चतोडा येथील पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाचही संशयितांना गुरूवारी अटक केल्यानंतर त्यांना यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एस.बी.वाळके यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता या सर्व पाच जणांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे हे पुढील तपास करीत आहेत.